बीड: राज्यात विधानसभा निकालात अनेक सत्ताधारी भाजपाच्या मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यात माजी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना त्यांच्या हक्काच्या परळी मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला. पंकजांचे बंधू धनंजय मुंडे यांनी निवडणुकीत बाजी मारली होती. राज्यातली सत्ता गमावल्यानंतर, देवेंद्र फडणवीसांवर मुळ कार्यकर्त्यांना डावलून इतर पक्षातील उमेदवारांना जागा दिल्याचा आरोप होतो आहे. अशातच पंकजा मुंडे यांनी राज्यात राजकीय भूकंप घडवण्याची तयारी सुरु केल्याच्या चर्चा आहेत. पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं आहे.
या पोस्टमध्ये पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की, निवडणुका झाल्या निवडणुकीचे निकाल ही लागले. निकालानंतर राजकीय घडामोडी, कोअर कमिटीच्या बैठका, पक्षाच्या बैठका, हे सर्व आपण सर्वजण पाहत होता. पराभव झाल्यानंतर काही क्षणातच माध्यमांसमोर जाऊन मी तो स्वीकारला. आणि विनंती केली की कुणीही याची जबाबदारी कुणावरही टाकू नये. सर्व जबाबदारी माझी आहे असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुंडेसाहेबांनी एका क्षणात मला राजकारणात आणलं. एका क्षणात ते आपल्यातून निघूनही गेले. पहिल्यांदा मुंडेसाहेबांचा आदेश म्हणून मी राजकारणात आले आणि नंतर मुंडेसाहेबांच्या पश्चात जनते प्रती असलेल्या जबाबदारी म्हणून राजकारणात राहिले. आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे असं सांगितले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे भाजपा सोडणार की सक्रीय राजकारणातून बाजूला होणार याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.