मुंबई: भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे ह्या भाजप सोडणार असल्याची एकच चर्चा सुरु आहे. पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. यावरुन त्या भाजपला सोडणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र पंकजा मुंडे या भाजप सोडण्याचा विचारही करू शकत नाही असे सांगत पंकजा मुंडे यांच्याबद्दल केवळ अफवा पसरविली जात असल्याचे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. पंकजा मुंडे या भाजपात होत्या, आजही आहे आणि पुढेही राहतील असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडेच्या फेसबुक पोस्टचा विपर्यास केला गेला, आम्ही पंकजा मुंडे यांच्या संपर्कात असून त्या पक्ष सोडणार नाही असा दावा केला आहे. अपघाताने नवीन सरकार आले असून ते किती दिवस टिकेल? याबाबत शास्वती नाही असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
पराभव झाल्यानंतर दु:ख होत असते, पराभवाची चिंतन करणे ही मानसिकता आहे, त्याचा विचार त्यांनी केला आहे. याचा अर्थ पक्ष सोडणे हा होत नाही असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
१२ डिसेंबरला स्व.गोपीनाथराव मुंडे यांची जयंती असते, त्यानिमित्त मोठा कार्यक्रम घेतला जातो. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहतात. यंदाही ते राहतील असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.