पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहायकाची बनावट ऑडीओ क्लिप व्हायरल!

0

परळीत अनोळखी मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा

मुंबई:- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहायकाने पैशाची देवाणघेवाण केल्या संबंधीची आॅडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली. ही आॅडिओ क्लिप पूर्णतः बनावट असल्याचे मुंडे यांनी सांगितले असून हे बदनामीचे षडयंत्र उघड झाले आहे. या प्रकरणी परळी पोलिसात अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचेही पंकजा मुंडे यांनी सांगितले. कथित ऑडीओ क्लिप प्रकरणी मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रदीप कुलकर्णी यांनी अनोळखी मोबाईल धारकाविरुद्ध परळी वैजनाथ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .

प्रकरणाला राजकीय वास
दरम्यान सध्या विधिमंडळातील दलालीच्या संबंधाने होत असलेला आरोप व वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध होणाऱ्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपानंतर अचानक पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहायकाची बनावट ऑडीओ क्लिप व्हायरल होते यामागे कुठेतरी राजकीय वास असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. निव्वळ बनावट संवाद केलेली ही आॅडिओ क्लिप जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना कुलकर्णी यांनी यवतमाळ येथील संजय राठोड हा व्यक्ती कोण आहे हे आपणास माहीत देखील नाही, त्याची कधी भेटही झाली नाही तसेच या क्लिप मधील आवाज माझा नाही असे म्हटले आहे. माझ्या नावाचा ऑडीओ क्लिप मध्ये जाणीवपूर्वक उल्लेख करत माझी व त्या माध्यमातून पंकजा मुंडे यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने हे षडयंत्र रचण्यात आले असल्याचे स्पष्ट होते. या बाबत आपण रितसर फिर्याद दाखल केली असून हे षडयंत्र करणाऱ्या लोकांवर सखोल चौकशी करून कडक कारवाई करावी अशी मागणी स्वीय सहाय्यक कुलकर्णी यांनी पोलिसांकडे केली आहे.