चोपडा । येथील पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशी निमित्ताने विविध कार्यक्रम सादर करून हर्षोल्हासात साजरे करण्यात आले. विठ्ठल माऊलींच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक व्ही.आर. पाटील यांनी करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी बाजीराव तायडे, नितीन वाल्हे या शिक्षकांनी अभंग गायन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच दुर्गेश चौधरी, रोहिणी माळी तसेच गायत्री सोनवणे या विद्यार्थ्यांनीही अभंग गायन करून कार्यक्रम संगीतमय केला.
यावेळी रतन माने यांनी महाराष्ट्रातील संत परंपरा विशद केली तर मुख्याध्यापक व्ही.आर. पाटील यांनी वारकरी संप्रदाय आणि पंढरपूर वारी याविषयी मार्गदर्शन केले.
चिमुकल्यांकडून विठ्ठलाचे दर्शन
कार्यक्रमच्या शेवटी देवेंद्र वैद्य यांनी संगीतमय युगे अठ्ठावीस विटेवरी उभा या आरतीने वातावरण प्रसन्न केले तर इयत्ता 5 ते 7 वीच्या विद्यार्थीनी वारकरी वेशात आल्याने पंढरीचे स्वरूप शाळेला प्राप्त झाले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पौर्णिमा भादले, विजय पाटील, सचिन बारेला यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले. या कार्यक्रमास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.