पंकज 18 व्यांदा झाला विश्‍वविजेता

0

दोहा (कतार) । भारताच्या पंकज अडवाणीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करताना 18 व्यांदा विश्‍वविजेतेपदावर कब्जा मिळवला. बेस्ट ऑफ 15 फ्रेम्सच्या आयबीएसएफ जागतिक स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पंकजने मिळवले. दोहा येथे झालेल्या या स्पर्धेत पंकजने इराणच्या आमिर सरखोशला हरवत हे यश मिळवले.या लढतीतील पहिली फ्रेम आमिरने जिंकली होती. दुसर्‍या फ्रेममध्येही आमिरची बाजू वरचढ होती, त्यामुळे तो 2-0 अशी आघाडी घेणार असे वाटत होते. पण आमिरचा एक सोपा शॉट चुकल्यामुळे मिळालेल्या संधीचा पुरेपुर फायदा पंकजने उचलत सामन्यात बरोबरी साधली. या बरोबरीनंतर पंकजने मागे वळून पाहीले नाही. पंकजने 5-2 अशी आघाडी मिळवली. त्यात चौथ्या फ्रेममधील चीवट खेळाचा समावेश होता.

सहाव्या फ्रेममध्ये आमिरने केलेला 134 गुणांचा ब्रेकही पंकजला रोखू शकला नाही. दुसर्‍या सत्रातही पंकजने आपले वर्चस्व कमी होऊ दिले नाही. चांगला खेळ करत पंकजने 6-2 अशी आघाडी वाढवली. त्यानंतर आमिरने पंकजला अडचणीत आणायचे अनेक प्रयत्न केले. पण अमिरने केलेल्या चुकांचा फायदा उचलत पंकजने शांतपणे खेळ करत छोटे छोटे ब्रेक करत विजेतेपदाच्या दिशेने कूच केले. स्नुकरमधील मुख्य प्रारुपातील पंकजचे हे तिसरे जागतिक विजेतेपद आहे. पंकजने 2003 मध्ये पहिल्यांदा विश्‍वविजेतेपद मिळवले होते.