पुणे । तुम्ही दुचाकीवरून जात असताना जर अचानक तुमच्या पाठीमागून गाडीवर येणारी व्यक्ती तुम्हाला तुमच्या गाडीच्या चाकातील हवा कमी असल्याचे सांगत असतील तर त्यांच्याकडे चुकूनही लक्ष देऊ नका. कारण तुमचा खिसा रिकामा करणारे ते एक मोठे रॅकेट असू शकते. तुम्ही गाडी चालवत असताना तुम्हाला जाणवत नाही पण त्या व्यक्तीला तुमच्या गाडीतील हवा कमी झाल्याचे दिसते. त्यानंतर तुम्ही जवळच्याच पंक्चरवाल्याकडे जाता आणि एक, दोन नव्हे तर चांगले 7 ते 8 पंक्चर असल्याचे सांगत तुमच्याकडून हजारो रुपये उकळले जातात.
एका दिवसात अनेकांची फसवणूक
खडकी ते दापोडीच्या दिशेने प्रवास करताना या रस्त्यावर काही ठराविक अंतरावर पंक्चरवाल्यांची अनेक दुकाने आहेत. ही सर्व दुकाने एकाच मालकाची आहेत. त्यांनी अव्वाच्यासव्वा भाडे देऊन घेतली जागा घेतली आहे. गाडीत हवा कमी असल्याचे सांगणारे (कॉलर) आणि पंक्चर काढणारे संगनमताने नागरिकांना लुबाडत असल्याचे एका व्यक्तीने सांगितले.
कारवाईची मागणी
परिसरातील नागरिकांनाही या गोरखधंद्याची कल्पना आहे, परंतु कुणीही याविषयी उघडपणे बोलण्यास तयार नाही. पोलिसांनीही कारवाई करत पंक्चर काढणार्यांचे साहित्य जप्तही केले होते. परंतु काही दिवसानंतर हा प्रकार पुन्हा सुरू झाला. या सर्व प्रकारांना नागरिक आता वैतागले असून नागरिकांची फसवणूक करणार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
2 ते अडीच हजार खर्च
एक पंचविशीतील तरुणीही त्याच रस्त्याने दुचाकीवर जात होती. तिलाही पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तरुणाने चाकात हवा कमी असल्याचे सांगितले. तिने सुद्धा जवळच्याच दुकानात धाव घेतली असता 7 ते 8 पंक्चर असल्याचे सांगितले. तिलाही 2 ते अडीच हजार रुपये खर्च सांगितला. त्या तरुणीनेही हो-नाही करत शेवटी पैसे टेकवले आणि निघून गेली. शहरातील बाणेर रोड, सिंहगड रोड, पुणे स्टेशन परिसरात यासारखे अनेक प्रसंग घडताना दिसतात. यामध्ये दुचाकीस्वारांच्या खिशाला सर्रास कात्री लावण्यात येते. हे रॅकेट विरोध करू न शकणारे सावज हेरते. यामध्ये शक्यतो तरुणी, लहान मुलासोबत असलेली व्यक्ती किंवा बाहेरगावाहून आलेले नागरिक यांचा समावेश असतो. प्रत्यक्षात हे एक मोठे रॅकेट असून परराज्यातून आलेली टोळी अशा प्रकारे नागरिकांची फसवणूक करून हजारो रुपये उकळत आहे.
तब्बल 6 पंक्चर
खडकीतील एक तरुण रात्रीच्या वेळी दापोडीच्या दिशेने जात होता. काही अंतरावर जाताच त्याला एकाने तुमच्या गाडीच्या पाठीमागच्या चाकातील हवा कमी असल्याचे सांगितले. त्यानेही त्या व्यक्तीच्या सांगण्यावर विश्वास ठेवत जवळच असलेल्या पंक्चरच्या दुकानाजवळ गाडी थांबवून हवा भरण्यास सांगितली. दुकानदारही तत्परतेने पुढे आला. त्याने बोलतर-बोलत हवा भरत असताना त्या तरुणाला गाडीच्या चाकाला एक नाही दोन नाही तर तब्बल 6 पंक्चर असल्याचे सांगितले. पंक्चरचा खर्च तब्बल दिड ते दोन हजार रुपये सांगितला.