पंख संस्थेतर्फे ‘कारगील शौर्यगाथा’ कार्यक्रम

0

हडपसर । पंख संस्थेतर्फे साधना विद्यालयात ‘ऋणानुबंध सैनिकांशी… व कारगील शौर्यगाथा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.लक्ष्य फाउंडेशनच्या अनुराधा प्रभुदेसाई यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रभूदेसाई पर्यटक म्हणून 2004 साली लडाखला गेल्या होत्या. तेव्हा 1999चे कारगील युद्ध समाजापर्यंत पोहोचलेच नाही, या विचाराने त्या अतिशय व्यथित झाल्या व त्यांनी लक्ष्य फाउंडेशनच्या माध्यमातून ‘कारगिल युद्ध व आपल्या जवानांच्या शौर्यगाथा’ समाजाला सांगायला सुरुवात केली.

भारतीय सैनिकांमध्ये जोपासल्या गेलेल्या दुर्दम्य आशावाद, राष्ट्रप्रेम, असामान्य कर्तृत्व व प्रखर राष्ट्रनिष्ठा यावृतींची व त्यांच्या खडतर आयुष्याची ओळख प्रत्येक नागरिकाला विशेषतः आजच्या तरुण पिढीला व्हावी म्हणून अतिशय तळमळीने त्या विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त कार्यक्रम करतात.ज्या सैनिकांच्या जीवावर आपण सामान्य नागरिक इतक्या निवांत आयुष्य जगतो, त्या सैनिकांप्रती आदर, निष्ठा आणि त्यांच्या जपलेल्या आपल्या देशावर आपल्या युवा पिढीने प्रेम करावे, आदर करावा व राष्ट्रप्रेम जागृत व्हावे या उद्देशाने त्या अतिशय तळमळीने विद्यार्थ्यांशी संवाद साधतात.

सैनिकांना सलामी देऊन सांगता
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत व्हावे व त्यांना आपल्या देशाची, सैनिकांच्या समर्पणाची किंमत कळावी या उद्देशाने पंख सामाजिक संस्था व क्विकहील यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला गेला. अनुपमा काटकर, अजय शिर्के हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. पंख संस्थेच्या संचालक स्मिता आपटे, सीमा ननावरे, कल्याणी भाबड व सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सर्व सैनिकांना सलामी देऊन करण्यात आली.