पंचगंगा, महर्षी दयानंद संघाची आगेकूच कायम

0

मुंबई । शेलारमामा फाउंंडेशनने जय भारत सेवा संघाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत पंचगंगा, विकास, ओम् श्री साईनाथ, श्री गणेश व्यायाम शाळा, साई के दिवाने, दिलखूश यांनी पुरुष द्वितीय श्रेणीत, तर महर्षी दयानंदने महिला गटात उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. श्रमिक जिमखाना येथे शेलारमामा चषकासाठी सुरू असलेल्या महिलांच्या सामन्यात महर्षी दयानंदने हिरकणीचा 43-03 असा धुव्वा उडवीत सहज उपांत्यपूर्व फेरी गाठली. अश्‍विनी शेवाळे, शिवानी बैकर यांनी झंजावाती खेळ करीत विश्रांतीलाच 21-01 अशी भक्कम आघाडी घेत सामन्यावर आपले वर्चस्व राखले होते. विश्रांतीनंतरही तोच जोश कायम राखत सामना मोठ्या फरकाने आपल्या नावे केला. हिरकणीच्या एकाही खेळाडूचा या सामन्यात प्रभाव पडला नाही.

द्वितीय श्रेणी पुरुषांत पंचगंगा संघाने जय खापरेश्‍वरला 37-17 असे सहज नमवले. मध्यांतराला 18-06 अशी भक्कम आघाडी घेणार्‍या पंचगंगाने नंतर सावध खेळ करत सामना सहज आपल्या खिशात टाकला. नितीन सावंत, कल्पेश जाधव यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. खापरेश्‍वरचा सचिन सुर्वे चमकला. विकास साईराज हा सामना अत्यंत चुरशीने खेळला गेला. शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढविणार्‍या या सामन्यात अखेर विकासने बाजी मारली. विकासने मध्यांतरातील 06-18 अशी 12 गुणांची पिछाडी भरून काढत साईराजचा प्रतिकार 29-26 असा मोडून काढला. विकासाच्या ओमकार पाटील, अजय पाटील यांनी विश्रांतीनंतर टॉप गीअर टाकत झंजावाती खेळ केला व संघाला उपांत्यपूर्व फेरी गाठून दिली. साईराजच्या आशिष शिंदे, केतन यांनी उत्कृष्ट खेळ करत संघाला विश्रांतीला आघाडी मिळवून देण्यात यश मिळविले होते.

उत्तरार्धात मात्र त्यांचा प्रभाव पडला नाही. एवढी मोठी आघाडी टिकवण्यात त्यांचे संघ सहकारीही कमी पडले. त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरी जावे लागले. ओम् श्री साईनाथने हिंदमाताला 27-24 असे चकविले. मध्यांतराला विजयी संघाकडे 15-06 अशी आघाडी होती. साईनाथकडून सर्वेश लाड, विघ्नेश टेमकर, तर हिंदमाताकडून सागर पांचाळ, स्वप्निल करलकर यांनी उत्कृष्ट खेळ केला.