पंचनामे करा, अन्यथा संत्रा फेको आंदोलनाचा इशारा

0

अमरावती । मोठ्या प्रमाणावर होणारी संत्रा गळती ही शेतकर्‍यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. गळतीचे पंचनामे कृषी विभागाने 2 दिवसात केले नाही तर कृषी विभागावर संत्रा फेको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू यांनी आज अचलपूर तालुक्यातील चमक, चांदुरबाजार तालुक्यातील जसापूर, माधान, कोदोरी, तोडगाव, या गावातील संत्रा फळबागांची पाहणी केली. अमरावती जिल्ह्यातील संत्रा बागेला यावर्षी मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. पण या गळतीवर कृषी विभागाकडून कोणत्याच प्रकरची माहिती संत्रा उत्पादक शेतकर्‍यांना मिळत नाही. यावर्षी संत्र्याला चांगले भाव आहे. मात्र कृषी विभागाच्या अनास्थेमुळे या शेतकर्‍यांची ही स्थिती निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय संशोधनालाही विचारणार जाब
संपूर्ण सरकार ऑफलाइन झाले असून सरकारला कसलीही चिंता नसल्याचे त्यांनी सांगितले. केवळ पोथी पारायण आणि जास्त अभ्यासाचे हे परिमाण आहेत. तसेच सरकार फक्त जाती धर्माच्या नावावर मते मागायला शिकले आहे. आता तरी शेतकरी जागा झाला पाहिजे, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले. तर राष्ट्रीय संशोधन संत्रा केंद्राला सुद्धा आपण जाब विचारणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीचा सर्व घोळ सुरू असल्याचे चित्र पाहून बच्चू कडू यांनी भाजपा सरकारला टोला मारला.