पंचनामे झाले नाही तरी मदत देणार: मुख्यमंत्री

0

मुंबई: राज्यात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जवळपास ७० टक्के पिके वाया गेली आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल तसेच आवश्यक सर्व मदत देण्याचे आश्वासित करत सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

आज शुक्रवारी त्यांनी प्रसार मध्यमाद्वारे शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. उद्या शनिवारी तातडीने मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक बोलविण्यात आली असून त्यात नुकसानीबाबत चर्चा होणार असून मदतीबाबतचा निर्णय जाहीर होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पिक विमा कंपन्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा केली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मोबदला देण्याबाबत विमा कंपन्यांना आदेश दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विमा कंपन्यांकडे पंचनामा करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नसल्याने सरकारी पंचनाम्यानुसारच नुकसान भरपाई द्यावे अशी विनंती केली असता विमा कंपन्यांनी ती मान्य केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे झाले नाहीत अशा शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही, पंचनामे झाले नाही तरी आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी पंचनामे केले नाही तरी स्वत: शेतकऱ्यांनी फोटो काढून पाठवावे त्याचाही विचार केला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.