पंचांच्या निर्णयाला विरोध केल्यानेच कुटुंब वाळीत!

0

पिंपरी-चिंचवड : वैदू जातपंचायतीच्या पंचांनी दिलेल्या निर्णयाला विरोध केला म्हणून, जातपंचायतीने पिंपळेगुरव येथील रामभाऊ लोखंडे व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले होते. याविरुद्ध लोखंडे यांनी मंगळवारी सांगवी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये राजू रामा लोखंडे, प्रकाश रामा लोखंडे, दशरथ हुसेन लोखंडे, संभा बापू लोखंडे, शंकर यल्लापा लोखंडे, हणुमंत लक्ष्मण लोखंडे (सर्व रा. वैदुवस्ती, पिंपळेगुरव) यांचा समावेश आहे. यातील राजू लोखंडे हे प्रभाग क्रमांक 29 मधील भाजपच्या नगरसेविका चंदा लोखंडे यांचे पती आहेत. या सर्वांवर महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण (प्रतिबंधक, बंदी व निवारण) कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

पंचांनी जातीबाहेर टाकले
रामभाऊ लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जातपंचायत बरखास्त करणे अपेक्षित होते. मात्र, वरील आरोपी हे जातपंचायतीचे पंच असून, त्यांनी जातपंचायत बरखास्त करणे मान्य केले नाही. तसेच समाजाचे निर्णय देण्यासाठी वेळोवेळी जायपंचायत बसवली गेली. याला रामभाऊ यांनी विरोध केला असता त्यांनाच जातीच्या बाहेर टाकण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

गावातील मंदिरात केली होती प्रवेशबंदी
यावेळी 2014 मध्ये 50 हजार रुपये भरून रामभाऊ लोखंडे यांच्या कुटुंबाला पंचांनी समाजात घेतले खरे. पण पंचायत पुढे सुरुच राहिली. रामभाऊ यांनी पुन्हा जातपंचायतचा निर्णय अमान्य केला. यावेळी मात्र, पंचांनी रामभाऊ यांना गावाच्या गणेश आणि समाज मंदिरात मज्जाव केला. त्यांच्या घराच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही, असे जाहीर केले. एवढेच नाही तर, त्यांच्या मुलीची व मुलाची समाजामध्ये कोठेच सोयरिक होऊ देणार नाही. तसेच समाजात राहायचे असेल तर जातपंचायतीचे व समाजाचे नियम पाळावे लागतील, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे रामभाऊ यांनी थेट सांगवी पोलीस ठाणे गाठत पंचाविरुद्धच गुन्हा दाखल केला. पुणे परिसरात हडपसर, चतु:श्रृंगी, चाकण, सांगवी, पिंपळेगुरव या भागात वैदू समाजाचे वास्तव्य आहे.