पंचांना स्थानिक खेळाडूंपेक्षा जास्त मानधन

0

नवी दिल्ली :- क्रिकेटमधील पंचांना देण्यात येणारे मानधन हे स्थानिक खेळाडूंच्या उत्पन्नापेक्षाही जास्त आहे. बीसीसीआय बोर्डाचे माजी सचिव निरंजन शाह यांनी लक्षात आणून दिले आहे. स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना व सामनाधिकाऱ्यांना जास्त मानधन देण्याची मागणी केली आहे. याबाबत सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, केरळ क्रिकेट असोसिएशन व नॅशनल क्रिकेट क्लब या सदस्य संस्थांनी 22 जून रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविली आहे.

२२ जून रोजी सर्वसाधारण सभा
नवी दिल्लीमध्ये 22 जून रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलावली असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी याप्रकरणी नोटिस जारी केली आहे. बोर्डाच्या अॅडमिनिस्ट्रेशन कमिटीने 12 एप्रिलच्या बैठकीत पंचांचं मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे टॉपच्या 20 पंचांना टी-20 वगळता बीसीसीआयच्या अन्य सामन्यांमध्ये प्रतिदिन 40 हजार रुपये इतके मानधन मिळणार आहे. तर टी-20 सामन्यांसाठी त्यांना सध्याच्या 10 हजारांच्या जागी 20 हजार रुपये इतके मानधन देण्यात येणार आहे. तर प्रथम श्रेणीच्या स्थानिक सामन्यांसाठी क्रिकेटपटूंना प्रतिदिन 35 हजार रुपये देण्यात येतात. त्यामुळे आता अंपायर्स या खेळाडूंपेक्षा जास्त कमावतील असे चित्र निर्माण झाले आहे. पंचांचं व अन्य कर्मचाऱ्यांचं उत्पन्न वाढणं ही चांगली बाब असली तर त्यांचं उत्पन्न खेळाडूंपेक्षा जास्त असणं ही धक्कादायक आणि आश्चर्यकारक बाब असल्याचं शाह यांनी म्हटलं आहे. क्रिकेटपटूंपेक्षा अंपायर्सचं मानधन जास्त कसं काय असू शकतं हे आपल्याला समजूच शकत नाही अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.