पंचायतराज समित्यांच्या नजरेत नंदुरबारचा भकास चेहरा

पंचायतराज समिती घेऊन गेली जिल्हा परिषदेची कुंडली

रवींद्र चव्हाण

नंदुरबार : जिल्ह्यात येऊन गेलेल्या पंचायत राज समितीने एकूणच विकास कामांमध्ये त्रृट्या काढून नाखुषी दर्शविली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न, शाळांची अवस्था, ग्रामपंचायतींमधील संशयीत कारभार, त्यातच अधिकार्‍यांची उदासीनता असा भकास चेहरा या समितीला नंदुरबार जिल्ह्यात आल्यावर पहायला मिळाला. त्यामुळे जिल्हा परीषदेच्या भ्रष्टाचाराची कुंडलीच जणू ही समिती सोबत घेऊन गेली. या सार्‍या प्रकरणाचा अहवाल एक महिन्याच्या आत सादर करण्याची सूचना पंचायतराज समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना दिली आहे.

अधिकार्‍यांच्या उदासीनतेने योजनांना खीळ
शासनाने करोडो रुपये ओतून नंदुरबार या आदिवासी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने चेहरा बदलण्याचा प्रयत्न केला. हे सत्य असले तरी या विकासाच्या पाहण्यासाठी येणार्‍या समिती समोर जिल्ह्याची अशी स्थिती दिसणे ही बाब लोकप्रतिनिधींसाठी शरमेची मानली जाते. प्रशासकीय स्तरावर राबविल्या जाणार्‍या विविध योजनांना अधिकार्‍यांच्या उदासीनतेमुळे खीळ बसत असेल तर लोकप्रतिनिधी ही यंत्रणा हाताळण्यात यशस्वी ठरते का? असा प्रश्न पडतो. नंदुरबार जिल्हा परीषदेने केलेल्या विविध विकास कामांची पाहणी आणि त्याचे मूल्यमापन करण्यासाठी आमदार संजय रायमुलकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पंचायतराज समितीने नुकताच तीन दिवसांचा नंदुरबार जिल्हा दौरा केला. दौर्‍यावर जाण्याआधी प्रथम समितीने जिल्हा परीषद सभागृहात आढावा बैठक घेऊन माहिती जाणून घेतली. लेखापाल अहवालासह अन्य बाबी पडताळून पाहिल्या. त्यानंतर या समितीने तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, नवापूर, शहादा या तालुक्यातील काही गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन झालेल्या कामांची पाहणी केली. या दरम्यान समितीने अनेकविध किस्से पाहिले.

जि.प.च्या कारभारावर समितीचे बोट
गावात ग्रामसेवक येत नाही, प्राथमिक आरोग्य केंद्राचाही तसाच प्रश्न, अंगणवाडीतील पोषण आहार, अपूर्ण कामे असताना बिल काढणे, या सार्या बाबी पाहून समितीने प्रचंड नाराजी व्यक्त केली. एकंदरीतच जिल्हा परीषदेच्या कारभारावर बोट ठेवत या समितीने नोंदी केल्या आहेत. याचा संपूर्ण अहवाल विधी मंडळाच्या पटलावर ठेवला जाणार आहे. काही प्रकरणांमध्ये सचिवांची साक्ष नोंदविली जाणार असून काही प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी लावली जाणार आहे, त्यात दोषी आढळणार्‍यांची गय केली जाणार नाही, असे समितीचे अध्यक्ष संजय रायमुलकर जाताना सांगून केले आहेत. या व्यतिरिक्त समितीने आणखी काय पाहिले या विषयी गोपनीयता असून त्याविषयी मात्र उत्सुकता लागली आहेत. नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर आलेली ही समिती जणू जिल्हा परीषदेची कुंडलीच घेऊन गेली आहे की काय ? असा प्रश्न पडू लागला आहे.