पंचायत राज समितीचा दौरा रद्द झाल्याने झेडपीचे नियोजन फेल!

0

जळगाव। जिल्हा परिषदेच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी पंचायतराज समितीची स्थापन करण्यात आली आहे. ही समिती प्रत्यक्ष जिल्हा परिषदेच्या कामकाजाची पाहणी करते. जळगाव जिल्हा परिषदेच्या कामकाज पाहणीसाठी येणारी पंचायत राज समितीचा दौरा आत्तापर्यत पाच वेळा रद्द झाला आहे. यंदा जिल्हा परिषदेतर्फे 18 ते 20 एप्रिल दरम्यान पंचायत राज समिती येणार असल्याने सर्व विभागातील कामकाज पुर्ण करण्यासाठी अधिकारी कर्मचार्‍यांनी कामाचा सपाटा लावला होता. मात्र पुन्हा एकदा या समितीचा दौर रद्द झाल्यासंबंधी पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन करत असलेले नियोजन पुन्हा एकदा व्यर्थ ठरले आहे. सहा वर्षानंतर समिती जिल्ह्यात येणार होती. दौर्‍या निश्‍चित झाल्याने जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांण्डेय हे मागील काही दिवसांपासून सतत कामकाजाचा आढावा घेत होते.

पंचायतराज समितीत 22 आमदार
राज्यस्तरीय पंचायतराज समितीत राज्य विधीमंडळ सदस्यांचा समावेश असतो. राज्यातील 22 आमदारांचा समावेश या समितीत आहे. पंचायत राज समितीचा दौरा पुन्हा लांबणीवर पडला आहे. यात जिल्ह्यातीलही आमदारांचा समावेश आहे. चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांचा या समितीत समावेश होता. ते या समितीत जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. समितीच्या दौर्‍यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने मार्च अखेरीस इतर कामे बाजूला ठेवून प्रशासकीय तयारी करीत होती.

अहवाल समितीला पाठविला
जिल्ह्यात पंचायतराज समितीचा दौर्‍या निश्‍चित झाल्याने त्यासाठी 15 मार्चपासूनच जिल्हा परिषद प्रशासन तयारीला लागले होते. मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात या समितीसाठी वार्षिक योजनांचा आढावा, लेखापरीक्षण अहवाल आदी बाबीची पूर्तता तयार करून अहवाल तयार करण्यात आला होता. समितीच्या अवलोकनार्थ ठेवण्यात येणारा अहवाल समितीला पाठविण्यात आला आहे.

18 रोजी सभा
जिल्हा परिषद पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली असून पदाधिकारी नियुक्ती प्रक्रिया देखील पुर्ण झाली आहे. या पंचवार्षिकची प्रथम सर्वसाधारणसभा 18 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. या सभेत जिल्हा परिषदेच्या विविध विषय समिती सदस्यांची निवड होणार आहे. पहिल्यांदा निवडुन आलेल्या सदस्यांची ही पहिलीच सभा असणार आहे. सर्वसाधारण सभेची तयारी जिल्हा परिषद प्रशासनातर्फे सुरु असल्याचे चित्र एकंदरीत दिसून येत आहे.