पंचायत समितीत भाजपाची ताकद वाढली मात्र झेडपीत अपेक्षाभंग

0

रावेर । तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाडी करणार्‍या उमेदवारानेच भाजपाला जिल्हा परिषदेत बहुमतापासून रोखलेले आहे. त्यामुळे आत्मविश्‍वासाने लढत देवून विजयी झालेले आत्माराम कोळी तालुक्यात चर्चेला आले आहे. फक्त 148 मतांनी पराभव झालेल्या भाजपाच्या गोमती बारेलांचा पराभव अनेक राजकीय गणिते मांडून गेला. हा पराभव भाजपा जिल्हाधिकार्‍यांच्या डोळ्यात सणसणीत अंजन घालणारा आहे. पंचायत समितीत भाजपाने ताकद वाढवली खरी पण अल्पशा मतांनी गेलेली जिल्हा परिषदेची जागा सत्तेसाठी पक्षांना वणवण करण्यासाठी भाग पाडणार आहे.

विवरे-वाघोद्यात राष्ट्रवादीने आयत्यावेळी केली खेळी
काँग्रेस-राष्ट्रवादीने समांतर जागा मिळाल्या नसल्यानेच आधीच राष्ट्रवादीच्या गोटात खलबले सुरु होते. त्यात काँग्रेस व सेनेने तडवी समाजाचा उमेदवार देवून भाजपासाठीही जागा सोपी केली होेती. परंतु आयत्यावेळी राष्ट्रवादीने पक्षाच्या एबी फॉर्म देवून आत्माराम कोळीला रिंगणात उतरविले तर खाली पंचायत समितीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष सोपान पाटील यांच्या मुलांच्या उमेदवारीने कोळी यांना मोठे बळ मिळाले व त्यांनी भाजपाच्या उमेदवाराचा अल्पशा मतांनी पराभव केला.

या गटात अशा झाल्या लढती
पाल-केर्‍हाळा गटात भाजपाने कमालीची मुसंडी मारत विजयश्री खेचून आणला व जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे या गटात मतदानाच्या आदल्या दिवशी वातावरण निर्मितीसाठी आले होते. ती खेळी यशस्वी होवून एक गट आणि दोन गणात भाजपाने कमळ फुलविले.

ऐनपूर-खिरवळ गटात विद्यमान राष्ट्रवादीचे सदस्य रमेश पाटील यांंच्या पत्नी बेबाबाई पाटील यांचा भाजपाच्या उमेदवार रंजना पाटील यांनी तब्बल 1 हजार 600 मतांनी पराभव केला तर सेना येथे तिसर्‍या स्थानी राहिली. हा पराभव रमेश पाटलांना आत्मचिंतन नक्की करायला लावणार आहे. येथे एक गट आणि दोन्ही गणात भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेे.

तांदलवाडी-निंभोरा गटात भाजपा, सेना, राष्ट्रवादी अशा तिरंगी काँटे की टक्कर झाली. येथून भाजपाचे नंदकिशोर महाजन यांनी सेनेच्या उमेदवारांचा सुमारे 1 हजार 300 मतांंनी पराभव केला तर राष्ट्रवादी येथे तीन नंबर राहिली. येथून गटात भाजप गणात भाजपा व राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले.

थोरगव्हाण-मस्कावद गटातून भाजपाचे उमेदवार कैेलास सरोदे यांनी सेनेच्या उमेदवारांचा तब्बल 1 हजार 400 मतांनी पराभव केला. काँग्रेस येथ तीन नंबर राहिली. गटात भाजप तर गणात सेना, भाजप निवडून आल्या आहे. चिनावल-खिरोदा गटातून काँग्रेसच्या उमेदवार सुरेखा पाटील यांनी भाजपाला तब्बल 2 हजार मतांनी पराभव केला. येथून गटात काँग्रेस तर गणात काँग्रेस तर चार मतांनी जिंकलेेली भाजपा आहे.

वरिष्ठांचा डाव अंगलट
विवरे बु. गणातून पंचायत समितीसाठी भाजपाकडून पक्षाचे सरचिटणीस वासुदेव नरवाडे येथून इच्छूक होते. समाजाचा पाठिंबा, पक्षाचे पद आणि जनसंपर्कच्या आधारावर हि जागा निवडून येण्याचा राजकीय विश्‍लेषकही दावा करीत असतांनाच नरवाडेंचे तिकीट कापून अजाबराव पाटील यांना देण्यात आले. जिल्हा भाजपाने आखलेला डाव त्यांंच्याच अंगलट येवून विद्यमान भाजपाकडे असलली जागा गमावून राष्ट्रवादीने ताब्यात घेवून झेडपीत सत्तादेखील रोखली.