ग्रामीण भागाचा कायापालट करण्याची नूतन पदाधिकार्यांची ग्वाही
भुसावळ- भुसावळ पंचायत समितीच्या सभापतीपदाची ठरल्याप्रमाणे भाजपाच्य प्रीती पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या पदासाठ केवळ त्यांचा एकमेव अर्ज सादर झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांना बिनविरोध घोषीत केले. जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर भुसावळ पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाचे सुनील महाजन यांना सव्वा वर्षासाठी सभापतीपदावर संधी देण्यात आली होती मात्र ठरल्यानुसार त्यांनी आपल्या कार्यकाळानंतर सभापतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानुसार शुक्रवारी सभापतीपदाची निवड प्रक्रिया पंचायत समितीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली.
प्रीती पाटील यांची बिनविरोध निवड
सभापतीपदाची निवड प्रक्रिया प्रभारी तहसीसलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय तायडे यांच्या उपस्थित झाली. यावेळी भाजपाच्या पंचायत समिती सदस्या प्रीती पाटील यांचा एकमेव अर्ज सादर झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी संजय तायडे यांनी दुपारी त्यांना सभापतीपदासाठी बिनविरोध घोषीत केले. यावेळी माजी उपसभापती मनिषा पाटील, पंचायत समिती सदस्या वंदना उन्हाळे, माजी सभापती सुनील महाजन, विजय सुरवाडे यांची उपस्थिती होती.तर प्रशासनातर्फे गटविकास अधिकारी एस.बी.मावळे, निवडणूक शाखेचे भगवान शिरसाठ उपस्थित होते.
हे होते सुचक अनुमोदक
शुक्रवारी सकाळी 11 वाजता प्रीती पाटील यांनी सभापतीपदासाठी नामाकंन पत्र सादर केले. या नामाकंन पत्रावर पंचायत सदस्या वंदना उन्हाळे सुचक तर अनुमोदक म्हणून विजय सुरवाडे यांनी स्वाक्षरी केली होती.नवनिर्वाचित सभापती प्रीती पाटील या पंचायत समितीचे माजी उपसभापती मुरलीधर पाटील यांच्या पत्नी असून त्यांनी खडका ग्रामपंचायतीचे सरपंचपदही भुषवले आहे तर उपसभापती पदाची निवड 11 जुलै रोजी होणार असून उपसभापतीपदासाठी वंदना उन्हाळे यांच्या नावाची चर्चा आहे.
फटाक्यांची आतषबाजी
सभापतीपदी प्रीती पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर होताच पंचायत समिती कार्यालयाबाहेर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून घोषणाबाजी केली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, सरचिटणीस भालचंद्र पाटील, नारायण कोळी, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योजनांचा गोरगरीबांना लाभ देणार -प्रीती पाटील
शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणार्या सर्व योजनांचा गोरगरीबांना लाभ मिळवून दिला जाईल तसेच भुसावळ तालुक्यात वरीष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असे सभापती प्रीती पाटील यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.