पंच्याहत्तरीत सूध्दा शिपाई म्हणून काम करणार्‍या आबांचा रोटरीतर्फे सत्कार

0

शिंदखेडा । पायजामा शर्ट आणि डोक्यावर लाल टोपी असा साधा पोशाख असलेले 85 वर्षाचे आबा स्टेजवर चढतात, व्यासपिठावरील प्रमूख पाहूणे त्यांना शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देतात त्याचवेळी निवेदक त्यांच्या कार्याची माहीती सांगतात आणि एकच टाळ्यांचा कडकडाट होतो. आबांच्या डोळ्यात अश्रू तरळतात कारण त्यांचा त्यांच्या आयूष्यात प्रथमच सत्कार होत असतो. शहरातील माळीवाड्यात राहणारे मधूकर (आबा) गिरासे यांचे येथिल बिजासनी मंगल कार्यालयात रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ झाला. यात अ‍ॅड. हर्षल अहिरराव यांची अध्यक्ष तर देवेंद्र नाईक यांची सेक्रेटरी म्हणून निवड झाली. दरवर्षी या सोहळ्यात वैशिष्ट्यपूर्ण काम करणाार्‍यांमध्ये मधूकर गिरासे या सत्काराचे मानकरी ठरले.

विकासोत येणार्‍या शेतकर्‍यांना करतात अचूक मार्गदर्शन
रोटरीचे पूणे येथिल गव्हर्नर मोहन पालेशा, धूळे जिल्ह्याचे आशिष अजमेरा आणि प्रफूल्ल शिंदे यांचे उपस्थितीत पदग्रहण केले. गिरासे यांची कौटूंबिक परीस्थित अत्यंत गरीबीची असून गेल्या साठ वर्षापासून ते विकासोत शिपाई म्हणून काम करत आहे. तूटपुंजा पगार असूनही त्यांनी त्यांचे काम सोडले नाही. या साठ वर्षाच्या काळात कधी रजा ही घेतली नाही. प्रत्येक आलेल्या शेतकर्‍याला कर्जा संदर्भात मार्गदर्शन करणे त्याचे कडे असलेल्या कागदपत्रांचे झेरॉक्स करून आणून देण, त्याला लागेल ती मदत प्रामाणिकपणे करणे, या शिवाय सोसायटीची कर्ज वसूली करण्यासाठी शहरासह परीसरातील गावांमधे त्यांच्या घरोघरोघरी फिरणे आणि वसूली करूनच आणणे आदी काम ते अगदी प्रामाणिकपणे करतात. आजचे त्यांचे वय आहे केवळ पंच्याहत्तरी असून या वयात घरातच बसून नातू पणतू सोबत खेळणे, देवधर्म करणे हे चित्र सर्वत्र असते. मात्र गिरासे त्याला अपवाद ठरले. या वयातही ते रोज किमान आठ ते दहा किलोमिटर कर्ज वसूलीसाठी पायी फिरतांना दिसतात. रोज हजारो रूपये वसूल करून आणतात. गेल्या साठ वर्षात एकही रूपयाची गफलत नाही. शेतकरीही अगदी विश्वासाने त्यांचेकडे हजारो रूपये देवून आबा पावती नंतर दिली तरी चालेल असे विश्वासाने सांगतात. सर्वजण त्यांना आदराने मधू आबा ओळखतात.

गुणवंताचा केला सत्कार
गिरासे यांचे सह दहावीत शंभरटक्के गूण मिळवणारी कु.निकीता जगदिश पाटील, बेस्ट रोटरीयन म्हणून रविंद्र माळी आणि बेस्ट प्रेसिडंन्ट म्हणून महेश पाटील यांचाही सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला.मावळते अध्यक्ष संजय पारख यांनी नूतन पदाधिकार्यांकडे सूत्र सोपविली. तेविस पदाधिकार्‍यांनी यावेळी पदग्रहण केले. मावळते सेक्रेटरी ऊज्वल पवार यांनी अहवाल सादर केला. प्रा. संदिप गिरासे आणि प्रा.जी.के. परमार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्रा.सूरेश देसले, उपनगराध्यक्ष ऊल्हास देशमूख, डॉ.ए.बी. बोरकर, डॉ.केदार फूलंब्रीकर, डॉ. प्रदीप गिरासे, डॉ.सूजय पवार, डॉ.देवेंद्र पाटील, विक्की चंदनानी आदी उपस्थित होते.