पंजाबमधून रेल्वेत बसून जळगाव पोहचलेला बालक सुखरुप वडीलांच्या स्वाधीन

0

दीड महिन्यांपासून होता बेपत्ता ; जननायक फांऊडेशन या सामाजिक संस्थेच्या मदतीने बालक बोदवडहून बालनिरिक्षक गृहात दाखल

जळगाव- पंजाब राज्यातील गुरुदासपूर येथून खेळत असतांना आठ वर्षीय बालक बोदवड रेल्वेस्थानकावर पोहचला व तेथून चुकून रेल्वेत बसून बोदवडला पोहचला. दीड महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या सुखवेदर सानी (वय 8) याला जननायक फाऊंडेशनच्या मदतीने तसेच पोलीस अधीक्षकांच्या सहकार्याने 28 रोजी सुखरुप त्याच्या वडीलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. दीड महिन्यांपासून लेकाचा चेहराही न बघितलेल्या वडीलांना सुखवेदरला पाहताच अश्रू अनावर झाले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखवेदर सानी हा बालक पंजाबमधील गुरुदासपुर येथे चौथीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. रेल्वे स्टेशनला लागूनच घर असल्याने गल्लीतल्या मित्रांसोबत खेळता खेळता सुखवेदर हा रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्मवर पोहचला. व चुकून मुंबईकडे येणार्‍या रेल्वेत बसला. 20 तारखेला ही गाडी बोदवड रेल्वेस्थानकावर थांबताच सुखवेदर गाडीतून खाली बोदवड स्थानकावर उतरला. रेल्वेस्थानकावर भेदरलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या सुखवेदरची बोदवड येथील जननायक फाउंडेशनचे नितीन पाटील व काही कार्यकर्त्यांनी चौकशी केली असता तो चुकून आल्याचे लक्षात आले.

पोलीसांच्या मदतीने पोहचला निरिक्षकगृहात
पराग कोचुरे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. कोचुरे यांनी संस्थेचे अध्यक्ष फिरोज पिंजारी व मंगला सोनवणे यांना ही माहिती देत तेथील कार्यकर्त्यांनी बालकाला जळगावला आणले. सर्व पदाधिकार्‍यांनी त्याची चौकशी केली असता तो गुरुदासपुर येथील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले. या पदाधिकार्‍यांनी डॉ.पंजाबराव उगले यांची भेट घेऊन बालकाच्या निवार्‍याची व्यवस्थेबाबत मदत मागितली. डॉ.उगले यांनी जिल्हा पेठ पोलिसांना सूचना देऊन बालकाला बालनिरीक्षणगृहात पाठविले.

इंटरनेट ठरले शोधकामी महत्वाचा दुवा
इंटरनेटच्या माध्यमातून पिंजारीसह पदाधिकार्‍यांनी गुरुदासपुर येथील पोलीस अधिकार्‍यांशी संपर्क करुन तेथील बालक जळगावात असल्याची माहिती दिली. सोबत त्याचा फोटोही पाठविला. पोलिसांनी स्थानिक पातळीवर चौकशी केल्यावर हरविल्याची नोंद पोलिसात असल्याने तत्काळ पालकाशी संपर्क झाला. हलाखीची परिस्थती असलेले भाड्यासाठी आवश्यक पैसे मजुरीनंतर हाती लागल्याने रविवारी जळगावी पोहचले. व सुखवेदरला घेतले. जातांना भाड्याचेही पैसे नसलेल्या सुखवेदरच्या वडीलांना दोघांच्या जेवणासह परतीच्या भाड्यासाठी फिरोज पिंजारी, फरीद पटेल, मंगला सोनवणे, पराग कोचुरे, सपना कोळी व हारुन पिंजारी यांनी स्वतःजवळील पैसे गोळा करुन दिले.यानंतर पितापूत्र परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाले.