पंजाब : शेती करण्याच्या दृष्टीने हेरॉइनपेक्षा अफू चांगली आहे आणि पंजाबमध्ये अफूला कायदेशीर मान्यता द्यायला हवी अशी धक्कादायक मागणी काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी केली आहे. तसंच माझे काका खूप अफू खायचे आणि ते दीर्घायुष्य जगले असंही नवजोत सिद्धू यांनी सांगितलं.
पंजाबमध्ये ड्रग्सची मोठ्या प्रमाणात तस्करी झाल्याने तेथील युवक मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन झाला. या ड्रग्सच्या अवैध व्यवसायामुळेच अकाली दल-भाजप सरकारला २०१७मध्ये पराभव पत्करावा लागला होता. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचे सरकार राज्यात ड्रग्जची तस्करी करण्याऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा कायदा करण्याच्या तयारीत आहेत. दोन वर्षांपूर्वी ड्रग्जच्या मुद्द्यावरून काँग्रेसने विधानसभेत गदारोळही केला होता. अशा परिस्थिती सिद्धू यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सगळीकडूनच त्यांच्यावर टीका होते आहे. अफूची शेती केल्यास गेल्या काही वर्षांपासून तोट्यात जाणारा पंजाबमधील शेतकऱ्याचा नफा होईल असं मतं ही सिद्धूनी व्यक्त केलंय.
‘माझे काकाही घ्यायचे अफू’
अफूची शेती कायदेशीर होण्यासाठी आप नेते धर्मवीर सिंह यांनी पंजाबमध्ये मोठी चळवळ उभी केली आहे. या चळवळीबद्दल बोलताना सिद्धू म्हणाले,’ धर्मवीर सिंह यांची ही चळवळ अत्यंत चांगली आहे. अफूमध्ये अनेक औषधी गुण असतात. माझे काकाही शेवटपर्यंत अफू घ्यायचे आणि ते दीर्घायुषी ठरले’