नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या उपस्थितीत आज पंजाब काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जाहीरनामा प्रकाशित केला. याप्रसंगी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, पंजाब काँग्रेस अध्यक्ष अमरिंदर सिंह, अंबिका सोनी उपस्थित होत्या. या जाहिरनाम्यात प्रामुख्याने पंजाबला नशामुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
पंतप्रधान मनमोहन सिंह हे पत्रकार परिषदेस संबोधित करताना म्हणाले ‘दहशतवादामुळे पंजाबातील अर्थव्यवस्था ढासळली होती. पंजाबच्या उभारणीसाठी यावर मात करणे आवश्यक आहे. मात्र मागील 10 वर्षांत यात काहीही सुधारणा झालेली नाही. 10 वर्षांत झालेले नुकसान भरून काढण्यासाठी हा जाहीरनामा उपयुक्त आहे. पंजाब काँग्रेस अध्यक्ष अमरिंदर सिंह यांनी जाहीरनाम्याची माहिती देताना सांगितले की चार आठवड्यांच्या आत पंजाब नशामुक्त करण्यात येईल. पंजाबात ग्रामीण भागात राहणार्या शेतकर्यांवर 67 हजार कोटी एवढे कर्ज आहे. आम्ही या शेतकर्यांना कर्जमुक्त करणार आहोत. तरुणांमध्ये दारूचे वाढते सेवन कमी करण्यसाठी दारूच्या बाटलीवर 1 टक्का अतिरिक्त अधिभार बसविला जाईल. बेरोजगारीच्या समस्येवर उपाय म्हणून हर घर मे नौकरी या योजना राबविली जाणार आहे. प्रत्येक बेरोजगार तरुणास 2500 रुपये बेरोजगारी भत्ता दिला जाईल. उद्योगांच्या वाढीसाठी वीजदर 7.60 टक्यांहून 5.00 वर आणला जाईल.’