पंजाब नॅशनल बँकेतून दहा लाख लंपास

0

धुळे । शहरातील सहाव्या गल्लीत असलेल्या पंजाब नॅशनल बँकेतून अज्ञात व्यक्तींनी दहा लाख रुपये लंपास करण्यात आल्याची घटना बुधवारी 10 रोजी घडली. विशेष म्हणजे ही रोकड बँकेच्या काऊंटरवरुन लंपास झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही रोकड कुठल्याही ग्राहकाची नसून ती बँकेची असल्याची चर्चा होती. बँकेतील सीसीटीव्ही चित्रणाद्वारे चोरट्यांचा शोध सुरु होता.

पैसे भरण्याचे केले निमित्त
शहरातील सहाव्या गल्लीत पंजाब नॅशनल बँक आहे. बँकेत ग्राहकांची गर्दी होती, त्यात दुपारी 12.30 वाजता चार अज्ञात व्यक्ती बँकेत दाखल झाले. त्यापैकी दोघांनी विविध रंगाच्या टोप्या परिधान केल्या होत्या. त्यातील एकाने पैसे भरण्याचे निमित्त करुन कॅशियर जवळील शिपायास दूर केले तर दुसर्‍याने वाद घालून त्याचे लक्ष वेधले. त्याच वेळी कॅशियर जवळ उभे असलेल्या तिसर्‍याने कॅशियरच्या कॅबिनचे दार उघडून ट्रेमधील रोकड उचलून पळ काढली. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी बँकेतील सीसीटिव्ही फुटेजची तपासणी सुरु झाली आहे. आझाद नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.