मुंबई | अंत्योदयाचा विचार केल्याशिवाय आपण समाजाला, देशाला खऱ्या अर्थाने विकसित करू शकणार नाही, या पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेल्या विचाराला अनुसरूनच आज देशात कार्य होत आहे. हीच पंडित दीनदयाल उपाध्याय यांना खरी श्रद्धांजली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
अंत्योदयाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय, ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख व लोकनेते दौलतराव उर्फ बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा गौरव करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत मांडला, त्यावेळी ते बोलत होते
फडणवीस म्हणाले, राजकीय क्षेत्रामध्ये साधनशुचिता कशी असली पाहिजे, राजकारण हे सैद्धांतिक कसे असावे, यासंदर्भातला परिपाठ पं. दीनदयाल उपाध्याय यांनी घालून दिला आहे. भारतीय जनसंघाचे ते शिल्पकार होते. श्रेष्ठ विचारवंत, प्रचारक, प्रभावी वक्ते, पत्रकार, एकात्मिक मानव दर्शनाचे प्रणेते असे त्यांच्या जीवनाचे विविध पैलू होते. अतिशय साधारण घरात जन्मलेल्या पंडितजींनी पुढे उत्तरप्रदेशातल्या त्यांच्या प्रांतातील सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून लौकिक मिळविला होता. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासमवेत राजकीय विकल्प तयार करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.
मुख्यमंत्री म्हणाले, डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रभावनेचा विचार तयार झाला पाहिजे, असे विचार व्यक्त करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. या विचारांनी प्रेरित होऊन पं. दीनदयाल उपाध्याय त्यात सामील झाले. त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी राष्ट्रकार्यास प्रारंभ केला. १९४२ मध्ये ते प्रचारक झाले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव बनला. एकात्म मानव दर्शन सिद्धांत मांडून त्यांनी देशाला दिलेली विचारधारा पुढे भारतीय जीवनमानाचा अविभाज्य भाग बनली. भारताचा विकास हा भारतीय संस्कृतीवरच आधारित होऊ शकतो, या तत्वज्ञानावर ते नेहमी ठाम होते. पश्चिमी विज्ञानाचा त्यांनी पुरस्कार केला होता, तथापि पश्चिमी जीवनपद्धतीवर आधारित नव्हे तर केवळ भारतीय विचार, संस्कृती, परंपरा यांच्या माध्यमातून जे संशोधन झाले त्याच्या आधारावरच भारताचा विकास होऊ शकतो, असे त्यांचे मूलभूत तत्व होते. त्यांनी समाजाकरिता आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. लोककल्याण आणि राष्ट्रवादाशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही.
पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनकार्याविषयी अधिक माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणाचे जाणकार, लेखक, पत्रकार, तत्वज्ञानी अशी त्यांची ओळख होती. बालपणापासूनच संघटनाची त्यांची वृत्ती होती. नापास झालेल्या विद्यार्थ्यांची झिरो असोसिएशन तयार करून त्या विद्यार्थ्यांना शिकविले. प्राध्यापकाची नोकरी मिळत असतानादेखील आपले पूर्ण जीवन राष्ट्रकार्यासाठी समर्पित करण्याचा विचार त्यांनी मांडला. चंद्रगुप्त नावाच्या नाटकासह विविध प्रकारच्या साहित्याची त्यांनी निर्मिती केली. राष्ट्रधर्म प्रकाशन या संस्थेची स्थापना करून राष्ट्रधर्म मासिक, पांचजन्य साप्ताहिक आणि स्वदेश या दैनिकाच्या माध्यमातून राष्ट्रवादी विचार मांडण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. त्यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये कधीही अंतर नव्हते. तसेच सत्य आणि असत्य यांच्यामध्ये त्यांनी कधी भेद केला नाही. अत्यंत निर्धाराने काम करणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे.
फडणवीस म्हणाले, जो जन्माला आला, त्या प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. त्याला जगविण्याची जबाबदारी समाजाची आहे. ही भारतीय संस्कृती आहे, आणि त्यावरच आधारित आपली अर्थव्यवस्था उभी राहिली पाहिजे, असे विचार पं.उपाध्याय यांनी मांडले होते. संघर्षाच्या आधारावर परिवर्तन होऊ शकते, क्रांती होऊ शकते पण त्या आधारावर शाश्वत विकास होऊ शकत नाही. एकात्मभावाच्या आधारावर व्यक्ती, समाज आणि प्रकृती यांचे नाते आधारित आहे. त्यामुळे भोगवाद सोडून आवश्यक तेवढेच मिळवायचे आणि त्यावर आधारित जगायचे अशा प्रकारच्या परिस्थितीतून जर आपण जीवनाची निर्मिती केली तरच शाश्वत अर्थव्यवस्था आपण तयार करू शकू आणि शाश्वत विकासाकडे जाऊ शकू, हा विचारही त्यांनी मांडला होता. आज जगालाही हे तत्व पटले आहे.
पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या कार्याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘हर हाथ को काम, हर खेत को पाणी’ असे त्यांचे विचार होते. ग्रामोद्योग, लघु कुटीर उद्योग, जलसंधारण अशा विविध क्षेत्रावर त्यांनी भर दिला होता. विरोधी पक्ष म्हणजे विपक्ष नव्हे तर विकल्प असावे, असे म्हणणारे पं.दीनदयाल उपाध्याय विकासाची व्याख्या सांगताना म्हणतात, मानव जन्माला येतो, तो कृत्रिम पद्धतीने तयार करता येत नाही. समाज ही एक जिवंत सभा असते, ती राष्ट्राला जन्म घालते. ते कृत्रिमरित्या तयार करता येत नाही. कृत्रिमरित्या राष्ट्र तयार झाले तर ते टिकत नाही. प्रत्येक राष्ट्राचा एक नैसर्गिक स्वभाव असतो. त्यालाच आपण राष्ट्रीय अस्मिता म्हणतो. राष्ट्र ही मृतप्राय गोष्ट नाही. त्या राष्ट्रात राहणारे लोक त्याचा आत्मा असते. हे लोक जेव्हा राष्ट्रभावनेने काम करतात तेव्हा खऱ्या अर्थाने राष्ट्राचा विकास होतो,
त्यांच्या निधनानंतर संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना संसदेने पं.दीनदयाल उपाध्याय यांच्या कार्याचा गौरव केला होता. ‘एका सूर्याचा अस्त झाला, आता यापुढील प्रवास आम्हाला ताऱ्यांच्याच प्रकाशात करावा लागेल, अशा शब्दात अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पित केली होती, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
नानाजी देशमुख म्हणजे राजकीय जीवनाचा वस्तूपाठ
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उच्चशिक्षण घेतल्यानंतरही देशकार्यात झोकून देणाऱ्या नानाजी देशमुख यांनी समाजात राष्ट्रकार्य रूजविण्याचे कार्य केले होते. वयाची साठ वर्षे झाल्यानंतर राजकीय निवृत्ती घेऊन समाजकार्यात झोकून देणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांनी राजकीय जीवन कसे असावे याचा वस्तुपाठ घालून दिला, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
मुख्यमंत्री म्हणाले, शिक्षण हे आवडते कार्यक्षेत्र असणाऱ्या देशमुख यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे सरस्वती शिशू मंदिर ची स्थापना केली. आज या संस्थेच्या उत्तर प्रदेशमध्येच ३५ हजार शाळा आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासमवेत त्यांनी तीन नियतकालिकांच्या माध्यमातून अखिल भारतीय स्तरावर ओळख निर्माण केली. देशमुख यांनी नागपूर येथे बालजगत संस्थेची स्थापना केली तर बीड जिल्ह्यात जलसंधारणाचे मोलाचे काम केल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
रोजगारापेक्षा स्वयंरोजगारावर भर देणाऱ्या आणि प्रत्येक हाताला काम या उद्देशाने विविध उपक्रम राबविणाऱ्या नानाजींना राष्ट्रऋषीची उपमा दिली जाते. उत्तरप्रदेशमधील चित्रकूटमध्ये त्यांनी पहिले ग्रामीण विद्यापीठ स्थापन केले. कृषी क्षेत्रातील त्यांचे कार्य मोलाचे होते. महाराष्ट्रातील कृषी संजीवनी योजनेला नानाजी देशमुख यांचे नाव देण्यात आले आहे, ही महाराष्ट्राचे सुपुत्र असणाऱ्या नानाजी देशमुख यांना खरी श्रद्धांजली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
बाळासाहेब देसाई हे लोकनेते
बाळासाहेब देसाई यांच्या कार्याविषयी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतलेल्या देसाई यांनी विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. त्यांनी राज्य मंत्रिमंडळात विविध मंत्रिपदे तसेच विधानसभेचे अध्यक्षपदही भूषविले. मुख्यमंत्री होण्याची क्षमता असलेल्या या नेत्याला नियतीने लोकनेतेपद बहाल केले. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे.
पोलिसांची शासकीय निवासस्थाने, ईबीसी सवलत, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाची उभारणी, वृद्ध कलावंतांना मानधन असे काही महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी मंत्रिपदाच्या कारकिर्दीत घेतले. गेट वे ऑफ इंडिया समोरील शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीतही त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. सातारा जिल्ह्याच्या पाटण परिसराचा विकास करणाऱ्या देसाई यांनी राजकारणासोबतच समाजकारणातही मोठा सहभाग घेतला होता. महाराष्ट्राच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या बाळासाहेब देसाई यांचे कार्य कायम स्मरणात राहील, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.