मुंबई : चंद्रभागेत अवैध वाळू उपसा करणार्यावर महसूल विभाग कडक कायदेशीर कारवाई करणार असून चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये दोन्ही तीरांवर वारीच्या काळात दुर्घटना घडू नये यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या मदतीने मदतीने सुरक्षारक्षक नेमण्यात येतील, त्याचबरोबर चंद्रभागा नदीच्या पात्रात 11 जून रोजी घडलेल्या दुर्घटनाग्रस्त मुलांच्या कुटुंबियांना खास बाब म्हणून शिफारस करून महसूल विभागाकडून शासनाकडून लवकरच आर्थिक मदत देण्यात येईल, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले असल्याची माहिती शिवसेना उपनेत्या आ. डॉ. नीलम गोर्हे यांनी दिली. 29 जून रोजी डॉ. गोर्हे यांनी पंढरपूरला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली होती. यासंदर्भात पाहिलेल्या मुद्द्यांवर पुढील कार्यवाहीच्या दृष्टीने त्यांनी शनिवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेत चर्चा केली. वारीच्या पूर्वतयारीच्या कामांची पाहणी करण्यासाठी 3 जुलै रोजी मी स्वतः पंढरपूर येथे भेट देणार आहे, अशी माहितीही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्याचे आ. डॉ. गोर्हे यांना दिली.
विश्रामगृहाचे नवीन विस्तारित कक्ष
आजवर पंढरपूर देवस्थानला विविध आमदारांनी दिलेला व शासनाकडूनही देण्यात आलेला सुमारे 250 कोटी रुपयांचा उपलब्ध होऊनही पंढरपूर येथे भक्त निवास अजून का पूर्णत्वास आले नाही या व इतर बाबींचा आढावा घेण्यासाठी जुलैच्या दुसर्या आठवड्यात पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आणि आळंदी येथील सिद्धबेट विकास आराखड्याचा आढावा घेण्यासाठी संबंधित अधिकार्यांसोबत आ. डॉ. नीलम गोर्हे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात येणार आहे. आळंदी येथील शासकीय विश्रामगृह सध्या अपुरे पडत असल्याने येथे लवकरच नवीन विस्तारित कक्ष उभारण्याची डॉ. गोर्हे यांची मागणी त्यांनी त्वरीत मान्य केली.
* विठ्ठल मंदिरात नामदेव पायरीच्या वरच्या बाजूला बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचार्यांनी पादत्राणे काढूनच थांबावे.
* एकादशीच्या दिवशी भाविकांना बुंदीच्या लाडवाऐवजी राजगिरा लाडूचा प्रसाद.
* दर्शन मंडपात तयार झालेले खड्डे बुजवून होणार दर्शनाची व्यवस्था.
* आषाढी वारी दरवर्षी पेक्षा अधिक सुरक्षित आणि स्वच्छतापूर्ण होण्यावर अधिक लक्ष.
आंध्र व गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रातही मंदिर व्यवस्थापनाचे शिक्षण सुरु करण्याबाबत विचार व्हावा या सूचनेवर नक्की विचार करू. राज्यातील सर्वच देवस्थानचे पुजारी, मंदिरांचे व्यवस्थापन याविषयी राज्यभर एक समान सूत्र ठरविण्याचा प्रयत्न केला जाईल.
– चंद्रकांत पाटील,
महसूलमंत्री