पंढरपुरात शिवसेनेकडून भाजपविरोधी घोषणाबाजी !

0

सोलापूर- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पंढरपूर दौऱ्यावर आहे. शिवसेना पुन्हा एकदा शक्तिप्रदर्शन करत आहे. उद्धव ठाकरे पंढरपूरमध्ये दाखल झाले आहे. आजच्या सामना आजच्या सामन्यातील अग्रलेखावरून ते युतीसंदर्भात मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हजारो शिवसैनिक आज पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे युतीबद्दल आपली भूमिका स्पष्ट करणार का याबद्दल चर्चा सुरु असतानाच पंढपपुरामध्ये जमलेल्या शिवसैनिकांकडून मात्र सकाळपासून भाजपाविरोधी घोषणाबाजी केली जात आहे.

उद्धव यांच्या सभेसाठी पंढरपुरात दाखल झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. फडणवीस आणि दानवे यांचा एकेरी उल्लेख करत ही घोषणाबाजी करण्यात आली. ‘रावसाहेब दानवेचं करायचं काय खाली डोकं वर पाय’ तसेच ‘फडणवीसाचं कसं काय खाली मुंडकं वर पाय’ अशी घोषणाबाजी या शिवसैनिकांनी केली. त्याचप्रमाणे या शिवसैनिकांनी राम मंदिर झालचं पाहिजे अशी घोषणाबाजीही केली.

दरम्यान उद्धव ठाकरे सहकुटुंब पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. ठाकरे यांच्या पंढरपूर दौऱ्यातील सभेत शिवसैनिकांसह वारकरी संप्रदायाला मोठय़ा प्रमाणात सहभागी करून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे नेते, कार्यकर्त्यांनी ताकद पणाला लावली आहे.