पंढरपूर येथील महासभेसाठी जाणार महिला आघाडीच्या शेकडो महिला व पदाधिकारी

0

भुसावळ- अयोध्या येथील यशानंतर आता चलो पंढरपूर, असा संकल्प पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोडला आहे . देशात अन महाराष्ट्रात रामराज्य आणि शिवशाही आणण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पंढरपूर येथे महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. हा संकल्प सिद्धीस जावा यासाठी पक्षप्रमुख श्री विठूमाऊलीचे आशीर्वाद आणि त्यांच्या भक्तांच्या भेटीसाठी पंढरपूरमध्ये 24 डिसेंबरला येणार आहे. यासाठी प्रत्येक तालुकानिहाय नियोजन केले जात असून पंढरपूर येथील महासभेला महिला सुद्धा सहभागी होणार असल्याचे सांगत रावेर लोकसभा मतदार संघातून शेकडोच्या संख्येने महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना महिला आघाडी रावेर लोकसभा मतदार संघ संपर्क प्रमुख उषा मराठे यांनी केले आहे.

बैठकीत पदाधिकार्‍यांचा निर्णय
भुसावळच्या शासकीय विश्रामगृहात शिवसेना महिला पदाधिकार्‍यांची बैठक झाली. बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, चोपडा येथील जिल्हा संघटक रोहिणी पाटील, मुक्ताईनगर जिल्हा संघटीका पालवे, भुसावळ-जामनेर येथील जिल्हा संघटीका पूनम बर्‍हाटे, तालुका संघटक उज्वला बागुल, शोभा कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी जिल्ह्यांच्या व तालुक्याच्या वतीने संपर्क प्रमुख उषा मराठे यांचे स्वागत व सत्कार पूनम बर्‍हाटे व तालुका संघटक उज्ज्वला बागुल यांनी पुष्पगुच्छ देऊन केला. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार भुराबाई चव्हाण, वासंती चौधरी, कल्पना कोल्हे, भारती गोसावी, यांनी केला. प्रास्ताविक उज्वला बागुल तर आभार वासंती चौधरी यांनी मानले.