नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील सरपंचांशी संवाद साधला. याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी ई-ग्राम स्वराज्य वेबपोर्टलचे देखील उद्घाटन केले आहे. ई-ग्राम स्वराज्यवर ग्रामपंचायतीशी संबंधित सर्व योजनांची माहिती मिळणार असून हे मोबाईल अॅपवरही उपलब्ध असणार असल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली. नरेंद्र मोदी यांनी करोनाशी लढणार्या ग्राम पंचायतींचे केले कौतुक, पुरस्कार प्राप्त सर्व प्रतिनिधींचेही कौतुक केले.
यावेळी पंतप्रधान नरेेंद्र मोदी म्हणाले की, करोनामुळे आपल्या समोर अनेक समस्या आल्या. अनेक समस्या अशा होत्या ज्यांची आपण कधी कल्पनाही केली नव्हती. या समस्यांनी आपल्याला खुप काही शिकवले. यामुळे आपल्याला स्वावलंबी बनण्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश मिळाला. स्वावलंबी बनल्याशिवाय कोणत्याही संकटाचा सामना करणे अशक्य आहे. गाव, जिल्हे, राज्य, देश हे या निमित्ताने आपापल्या स्तरावर स्वावलंबी बनले. यापुढे आपल्याला कोणत्याही गोष्टींसाठी बाहेरच्या कोणावरही अवलंबून राहावे लागू नये इतके स्वावलंबी राहावे लागेल. सशक्त पंचायत हे स्वावलंबनाचे उदाहरण आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले. संकटकाळातच जीवनाची खरी करोटी असते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
‘दो गज दुरी’
सोशल डिस्टन्सिंग, लॉकडाउन अशा मोठ्या शब्दांचा प्रयोग न करता ‘दो गज दुरी’ अशा शब्द वापरून गावातील जनतेनं करोनाचा सामना केला. अशा प्रकारांवरूनच इतरत्र करोनाचा भारताने कसा सामना केला याची चर्चा होती. भारताचा नागरिक कठिण परिस्थितीत त्याच्या समोर झुकण्यापेक्षा त्याचा सामना करत आहे, असेही ते म्हणाले.