नवी दिल्ली – करोनाच्या आपत्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली असून ती सकाळी ११ वाजता दूरचित्रसंवादाद्वारे ( व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) होईल. या बैठकीसंदर्भातील पत्र संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी शनिवारी राजकीय पक्षांच्या नेत्यांना पाठवले आहे.
संसदेत पाचपेक्षा जास्त खासदार असलेल्या राजकीय पक्षांच्या दोन्ही सभागृहांतील गटनेत्यांना या बैठकीला बोलावले जाणार आहे. करोनाची महासाथ आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या उपायांची माहिती या नेत्यांना दिली जाईल. या बैठकीला संरक्षणमंत्री व लोकसभेचे उपनेते राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, प्रल्हाद जोशी, राज्यसभेचे गटनेता थावरचंद गेहलोत हे मंत्री उपस्थित असतील. या बैठकीत विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून आर्थिक समस्येबाबत आग्रही भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला दोन पत्रे पाठवली असून त्यात करोनामुळे गरीब कुटुंबांच्या हालअपेष्टा, त्यांना गरजेची असलेली आर्थिक मदत अशा विविध मुद्दयांवर पंतप्रधानांनी प्राधान्याने लक्ष घालण्याची विनंतीही करण्यात आली होती.
Prev Post