पंतप्रधानांच्या कार्यालयाबाहेर शेतकर्‍यांने काढले कपडे

0

नवी दिल्ली । दिल्लीतील पंतप्रधानांच्या कार्यालयाबाहेर सोमवारी शेतकर्‍यांनी कपडे काढून आंदोलन केले आहे. या सर्व प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांनी आमच्या मागण्या पूर्ण करा, अशा घोषणा दिल्या.

तामीळनाडूतील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी 40 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करावी या मागणीसाठी या शेतकर्‍यांचे दिल्लीत आंदोलन सुरू होते. सोमवारी जंतर मंतर येथे आंदोलनाला बसलेल्या तामीळनाडूतीलशेतकर्‍यांपैकी सात जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पीएमओ कार्यालयात नेण्यात आले. मात्र, पंतप्रधानांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ आणि पंतप्रधानांची भेट होऊ शकली नाही. शेवटी या शेतकर्‍यांना पंतप्रधान कार्यालयातील अधिकार्‍यांकडे निवेदन देऊन माघारी फिरावे लागले.

पोलिसांच्या गाडीतून या सर्वांना पुन्हा जंतरमंतरकडे नेले जात होते. यादरम्यान, एका शेतकर्‍याने गाडीतून उडी मारली आणि कपडे काढून रस्त्यावर पळू लागला. अवघ्या काही क्षणात गाडीतील अन्य दोन शेतकर्‍यांनीही गाडीतून उडी मारून त्याला साथ दिली. या शेतकर्‍यांनी आमच्या मागण्या पूर्ण करा, अशा घोषणाही दिल्या.

तामीळनाडूतील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन सुरू केले आहे. शेतकर्‍यांना पॅकेज जाहीर करण्याची त्यांची मागणी आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मिळावी, म्हणजे शेतकर्‍यांच्या समस्या थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील, असे या शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. पण अद्याप त्यांना मोदींच्या भेटीसाठी वेळ देण्यात आलेला नाही. दरम्यान, उत्तर प्रदेशातील शेतकर्‍यांना कर्जमाफी घोषित झाल्यानंतर अनेक राज्यातील शेतकर्‍यांनीही आम्हाला कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.