जळगाव – पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ फेब्रुवारी रोजी धुळे जिल्हयाच्या दौर्यावर येत आहेत. नागपूर येथून थेट विमानाने ते जळगाव विमानतळावर उतरून तेथूनच हेलीकॉप्टरने धुळ्याकडे रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर गुरूवारी नागपूरहून आलेल्या एका विशेष विमानाने नागपूर ते जळगाव हवाई मार्गाची पाहणी केली. त्या बरोबरच नागपूरहून जळगाव येण्यासाठी किती वेळ लागतो याचाही अंदाज घेतला. मोदी यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून विमानतळावर हेलीकॉप्टर बनविण्याची तयारी जोरात सुरू आहे. हेलीकॉप्टर बनविण्याचे काम शुक्रवारपर्यंत पूर्ण होणार आहे.
महामार्गाचे काम १६ पर्यंत थांबविले
औरंगाबाद जळगाव महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे काम सध्या कुसूंबा शिवारात सुरू आहे. या कामासाठी रस्ता दोघा बाजूंनी खोदावा लागत आहे. त्यात टेलीफोनच्या वायर मोठ्या प्रमाणात प्रभावीत होत आहेत. पंतप्रधान मोदी १६ फेब्रुवारीला जळगाव विमानतळावर येणार असल्याने तातडीची व्यवस्था म्हणून फोन लाईन सुरू ठेवणे आवश्यक असल्याने व विमानतळावर हॉटलाईन ची व्यवस्था करावी लागणार असल्यामुळे हे काम १६ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधीकारी राहूल मुंडके यांनी दिले आहेत.