भुवनेश्वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जलयुक्त शिवार अभियान भावले आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील जलयुक्त शिवारसारखे अभियान अन्य राज्यांनाही राबवावे, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला आहे. जलयुक्त शिवार अभियान बघण्याची इच्छा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही व्यक्त केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा समारोप येथे झाला. त्यात पंतप्रधानांनी मुख्यमंत्रीफडणवीस यांच्या जलयुक्त शिवार अभियानाचे कौतुक केले. देशात दुष्काळावर मात करण्यासाठी अशी मोहीम गरजेची असून, अन्य राज्यांनीही या अभियानाचे अनुकरण करावे, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला.
जलसंधारण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारने अन्य राज्यांना जलयुक्त शिवार मॉडेलचा अभ्यास करु देण्याची तयारी दर्शवली आहे. कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी जलयुक्त शिवार अभियानात रस दाखवला आहे. कर्नाटकातील अधिकार्यांनी त्यांच्या राज्यात जलयुक्त शिवारसारखी मोहीम राबवण्याची तयारी दर्शवल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्य सरकारने कर्नाटक सरकारला जलतज्ज्ञांची माहिती दिली आहे. जलयुक्त शिवारसाठी काम करणारे पोपटराव पवार आणि प्रा. राजेंद्रसिंह या दोघांशी चर्चा करण्याचा पर्यायही सरकारने कर्नाटकला दिला आहे. कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगण आणि आंध्रात पाणी टंचाईची समस्या गंभीर आहे. राजस्थाननेही जलयुक्त शिवारसारखे अभियान राबवून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पालकमंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यांमधील जलयुक्त शिवार अभियानाचा तपशील सादर करण्याचे आदेश दिले होते. जलयुक्त शिवार अभियान पूर्ण झाल्यावर त्याच्या देखभाल दुरुस्तीवर लक्ष दिले जाणार आहे.