पुणे । 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून हक्काचे घर मिळविण्यासाठी शहरातील लक्षावधी नागरिकांनी महापालिकेकडे अर्ज सादर केले आहेत. या अर्जांच्या छाननीचे काम सध्या सुरू असून त्यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटी दूर करण्यासाठी अर्जदारांना आणखी एक संधी महापालिका प्रशासनातर्फे दिली जाणार आहे. त्यासाठी सप्टेंबरच्या पहिल्या आणि दुसर्या आठवड्यात मोहीम राबविण्याचे नियोजन प्रशासनातर्फे केले जात आहे.
अर्जात तांत्रिक चुका
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हक्काच्या घरांसाठी 1 लाख 13 हजार नागरिकांनी अर्ज केले आहेत. आवश्यक कागदपत्रे जोडून महापालिकेकडे सादर झालेल्या अर्जांची छाननी केली जात आहे. अद्याप 12 हजार अर्जांची छाननी बाकी आहे. छाननीदरम्यान अर्जदारांनी काही तांत्रिक चुका केल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामध्ये काहींनी चुकीचा आधार क्रमांक दिलेला आहे, काहींनी बँक खाते क्रमांक भरताना चुका केल्या आहेत, पत्नीच्या नावे अर्जदारांनी सादर केलेल्या अर्जात स्वतःची माहिती दिली आहे, प्रत्यक्षातील प्राप्ती आणि घोषणापत्रातील प्राप्ती यांमध्ये तफावत आढळून येत आहे.
त्रुटी दुरुस्तीसाठी मोहिम
अर्जाच्या रकान्यांमध्ये भरलेल्या माहितीतही विसंगती आढळून येत आहे. मात्र, या तांत्रिक चुकांमुळे अर्जदार योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी अर्जदारांना त्रुटी दुरुस्तीची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आणि दुसर्या आठवड्यात दहा दिवस मोहिम राबविण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.