इंदापूर । पंतप्रधान आवास योजनेमुळे गरजूंना हक्काचे घर मिळणार आहे. यासाठी शहरात 1217 लाभार्थींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. इंदापूर नगरपरिषद आयोजित स्वच्छ भारत अभियान अंतर्गत इंदापूर शहरवासीयांना ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्यासाठी निळा व हिरव्या रंगाच्या डस्टबिनचे वाटप तसेच पंतप्रधान आवास योजना सर्वांसाठी, घर लाभार्थी सर्वेक्षण या कार्यक्रमाचा शुभारंभ पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. पंचायत समिती सभापती करणसिंह घोलप, नगराध्यक्षा अंकिता शहा, नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विलास वाघमोडे, इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. कृष्णाजी यादव, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, हर्षवर्धन पाटील सहकारी वाहतूक संस्थेचे चेअरमन रघुनाथ राऊत, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, मुख्याधिकारी रामनिवास झंवर आदींसह तसेच इंदापूर नगरपरिषदेचे नगरसेवक, नगरसेविका व इतर मान्यवर मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.
2.50 लाखांपर्यंत अनुदान
शहरातील प्रत्येक कुटुंबाला दोन डस्टबीन देण्यात येणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंर्तगत शहरात करण्यात येणार्या 1217 लाभार्थींचे सर्वेक्षणात 3 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणार्यांना 30 चौरस मीटर घरासाठी 2.50 लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. तर 6 लाख ते 11 लाख वार्षिक उत्पन्न असणार्यांसाठी 6.5 टक्के दराने कर्ज व्याज अनुदान 15 वर्षांपर्यंत फेडीवर मिळणार आहे.
अपंगांना 7,200 रुपयांच्य धनादेशाचे वाटप
सन 2000 पूर्वीपासून शासकीय जागेत राहणारे तसेच स्वत:च्या मालकीच्या जागेवर या योजनेतून घर बांधता येणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले. यावेळी इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने 50 अपंग लाभार्थ्यांना 7,200 रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी संतोष खंदार, अंकिता शहा, करणसिंह घोलप यांची भाषणे झाली. प्रास्ताविक इंदापूर नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम यांनी केले. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी तर नगरसेविका अनिता धोत्रे यांनी आभार मानले.