केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ
पहिल्या टप्प्यातील रक्कम शेतकर्यांच्या खात्यात वर्ग होणार; वार्षिक 6 हजार मिळणार
पुणे – केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकर्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार राज्यस्तरीय पातळीवर अंमलबाजवणीला सुरुवात कऱण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील एक कोटीपेक्षा अधिक अल्पभूधारक शेतकर्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवार 24 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक येथे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कृषी व पणन मंत्री सदाभाऊ खोत, सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, कृषी सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर आदी उपस्थित होते.
कागदपत्रे आवश्यक
अल्प-अत्यल्प भूधारकांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासन प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेद्वारे प्रती शेतकरी वार्षिक 6 हजार रुपये देणार आहे. त्यासाठी राज्यशासनाने 15 फेब्रुवारी रोजी अंमलबजावणीचे परिपत्रक देखील काढले आहे. शासन निर्णया प्रमाणे जिल्हा, गाव पातळीवर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक अधिकारी यांद्वारे पात्र शेतकर्यांची यादी तयार करण्यात येत आहे. यामध्ये शेतकर्यांचे नाव, पत्ता, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, जन्म तारीख तसेच सातबारा आणि इतर कागदपत्रे आवश्यक असणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे. तसेच ज्या शेतकर्यांकडे आधार कार्ड नसेल त्या शेतकर्यांनी स्वयं घोषणापत्र देण्याचे बंधनकारक आहे.
3 हप्त्यात मिळणार रक्कम
संबंधित माहिती तलाठी, ग्रामसेवक यांकडून प्रात यादीच्या छाननीनंतर अंतिम यादी केंद्र शासनाच्या पीएम किसान पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित शेतकर्याच्या थेट बँक खात्यात हा निधी जमा होणार आहे. ही योजना 1 डिसेंबर 2018 पासून लागू करण्याचे आदेश असल्याने शेतकर्यांना मागील वर्षाचे 2 हजार रुपये आणि चालू वर्षाचे 2 हजार असे एकूण 4 हजार रुपये प्रथम लाभ देण्यात येणार आहे. तर उर्वरित 4 हजार वर्षाच्या 3 हप्त्यात देण्यात येणार आहे.