ओवेसींची मोदी सरकारवर घणाघाती टीका
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी ज्या लोकांना भाऊ म्हणतात, त्याच लोकांनी देशाला लुटले आहे, सध्या भारत देश हिंदुत्वाकडे जात आहे. आम्हाला मुस्लिम असल्याने दुसर्या वर्गातील नागरिक असल्यासारखी वागणूक मिळत असल्याचे वक्तव्य एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी केले आहे.
चोक्सीसोबत काय संबंध आहेत?
दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना ओवेसी यांनी पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टिका केली. ओवेसी म्हणाले, गीतांजली जेम्सचे मालक मेहुल चोक्सी यांच्यासोबत काय संबंध आहेत? जे लोक आम्हाला पाकिस्तानी म्हणतात. त्यांना माझा सवाल आहे. हर्षद मेहता, केतन पारेख आणि नीरव मोदी हे मुस्लिम होते का?
मशिदीचा दावा सोडणार नाही
बाबरी मशिदीबाबत ओवेसी म्हणाले, अयोध्याच्या वादग्रस्त जागेवरील बाबरी मशिदीचा दावा आम्ही कधीच सोडणार नाही. आमची मशीद होती, आहे, आणि यापुढेही राहील. बाबरी मशीदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय श्रद्धेच्या आधारावर नव्हे तर पुराव्याच्या आधारावर येईल. जर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने आला तर बाबरी मशीद पुन्हा एकदा त्याच ठिकाणी उभी राहील. काही लोक या प्रकरणी आम्हाला भीती दाखवत आहेत. आमच्याविरुद्ध आवाज उठवत आहेत. ते आम्हाला दावा सोडायला सांगत आहेत. परंतु, मी त्यांना सांगतो की, अयोध्याच्या वादग्रस्त जागेवरचा मशिदीवरचा दावा मुस्लिम कधीच सोडणार नाहीत.
भारतातील मुसलमान रामाचे वंशज : गिरिराज
नवी दिल्ली : नेहमी आपल्या वक्तव्यामुळे वादात अडकणारे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भारतातील कोणताही मुसलमान बाबरचा वंशज नाही व कोणताही मुसलमान विदेशी नाही. भारतातील मुसलमान हे रामाचे वंशज आहेत, आमचे पूर्वज एकच असून फक्त पूजा पद्धती वेगळी असू शकते, असे दावा गिरिराज सिंह यांनी केला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवरच बाबरी मशीद उभारली जाईल, असे वक्तव्य एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी ओवेसींवरही तोंडसुख घेतले. ओवेसीसारखे लोक ज्यांच्या ह्दयात जिन्नांच्या भूताने प्रवेश केलेला आहे. ते देशाला तोडू इच्छितात, असा आरोप त्यांनी केला.