नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला शिवसेना भाजपमधील कडवटपणा मिटावा म्हणून आता थेट मोदीअस्त्र वापरण्यात आले आहे. थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत येणाचे निमंत्रण दिले आहे. राजधानीत गुढीपाडव्यानंतर भाजपने एनडीएतील घटक पक्षांसाठी स्नेहभोजन आयोजित केले आहे.
पुढील आठवड्यात होणार्या या स्नेहभोजनाला उद्धव ठाकरेंना आमंत्रण दिले जाणार आहे.
त्याचवेळी मोदी शिवसेना-भाजपमधील वाद आणि आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडीबाबत शिवसेनेची भूमिका याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करतील, अशी माहिती आहे. दुसरीकडे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील ‘मातोश्री’वर जाण्याची शक्यता आहे. युतीमधील तणाव निवळण्यासाठी भाजपचे मंत्री 29 मार्चला उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. दरम्यान, शिवसेनेचे लाड करण्यापेक्षा सरळ मध्यावधी निवडणुका घ्या किंवा इतर पक्षांतील संपर्कात असलेले आमदार घेऊन बहुमत सिद्ध करा, या मुद्द्यावर भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. पण त्याआधी उद्धव ठाकरेंशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. त्यानुसार पाटील आणि मुनगंटीवार उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहेत