अण्णांच्या राळेगणसिद्धीचा सर्वांनी आदर्श घ्यावा
भाजपा आमदार, खासदारांशी नमो अॅपवरून साधला संवाद
नवी दिल्ली : नमो अॅपवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशातील सर्व भाजपा आमदार-खासदारांशी संवाद साधला. मोदी म्हणाले, गाव सर्वसुविधांनी युक्त असावे, त्यासाठी भाजपा नेत्यांनी प्रयत्न करायला हवेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आदर्श गाव राळेगणसिद्धीपासून काहीतरी शिकायला हवे, असे पंतप्रधान म्हणाले. सदस्यांनी कमीत कमी एका गावामध्ये बदल घडून आणण्यासाठी स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. यावेळी, काही खासदार आणि आमदारांनी पंतप्रधानांसमोर म्हणणे मांडले. पंतप्रधानांनी आमदार, खासदारांशी बोलताना ग्रामविकासावर अधिक भर दिला होता.
तुमच्या मतदारांशी संवाद साधेन
या संवादात पंतप्रधान म्हणाले, जर खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील 3 लाखांपेक्षा अधिक लोक ट्विटरवर फॉलो करायला लागले तर मी याच माध्यमांतून थेट त्यांच्याशी बातचीत करायला तयार आहे. तर आमदारांसाठी जर त्यांच्या मतदारसंघात 1-2 लाख लोक ट्विटरवर त्यांना फॉलो करीत असतील तर त्यांच्याशी देखील मी संवाद साधायला तयार आहे. त्यांना वेळ देण्यास जरा उशार होऊ शकतो मात्र, त्यांच्याशी थेट संवाद साधायला मला आवडेल असे पंतप्रधान म्हणाले.
तरुणांच्या रोजगारावर लक्ष ठेवा
पंतप्रधानांनी खासदार आणि आमदारांना मुलांचे शिक्षण, ज्येष्ठांचे औषधोपचार आणि तरुणांच्या रोजगारावर लक्ष ठेवण्याच्या सुचना दिल्या. एका खासदाराशी संवाद साधताना मोदी म्हणाले, पहिल्यांदा हृदयाच्या आजारावर उपचारासाठी लाख-दीड लाख रुपये खर्च यायचा. आता हा खर्च खूपच कमी झाला आहे. साफ सफाई आणि लसीकरण योजनांवर विशेष लक्ष दिले पाहिजे. गावातील प्रत्येक घरात एलईडी बल्ब लावण्यात यावेत. शेतकर्यांना सोलर पंप लावण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, यामुळे त्यांच्या पैशात बचत होईल. गावांमध्ये थेट युरिया पोहोचवला पाहिजे. यामुळे त्यांचे येण्याजाण्याचे पैसे वाचतील. तसेच शेतकर्यांना पिकविमा घेण्यासाठीही प्रेरित करायला हवे, असे मोदी म्हणाले.