पंतप्रधान निवासस्थानी शेतकर्‍यांचा मोर्चा

0

नवी दिल्ली : दुष्काळाशी झगडत असलेल्या तामिळनाडुतील शेतकर्‍यांनी मार्च-एप्रिल महिन्यात दिल्लीत आपल्या खास पध्दतीने आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता पुन्हा हे शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीत आले आहेत. जवळपास पन्नास शेतकर्‍यांनी रविवारी दिल्लीतील निजामुद्दीन रेल्वे स्टेशनपासून लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवास्थानापर्यंत मोर्चा काढला होता. हा मोर्चा पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आल्यानंतर शेतकर्‍यांनी धरणे आंदोलन केले.

आंदोलन सुरू असताना दिल्ली पोलिसांनी पन्नासपेक्षा जास्त शेतकर्‍यांना ताब्यात घेऊन संसद मार्ग पोलिस ठाण्यात नेले. दुष्काळी पॅकेज व कर्जमाफीच्या मागणीसाठी हे आंदोलन केले.

मागच्या वेळी या शेतकर्‍यांनी जे आंदोलन केले होते त्यावेळी त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. तसेच त्यांचे आंदोलन बदनाम करण्याचाही संतापजनक प्रकार घडला होता. या आंदोलनाला प्रसिध्दी खुप मिळाली होती. परंतु, त्याचा उपयोग मात्र झाला नाही.

आज सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना तामिळनाडुचे शेतकरी दिल्लीत दाखल झाल्याने सरकारची डोकेदुखी वाढणार आहे. कर्जमाफीसह देशातील सर्व शेतकर्‍यांना निवृत्ती वेतन देण्यात यावे, कावेरीच्या पाण्यासाठी व्यवस्थापन मंडळ स्थापन करण्यात यावे, आदी मागण्या या शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहेत.