मुंबईः आज महराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. मुंबईतील सर्व लोकसभा मतदारसंघासह १७ मतदार संघात मतदान होत आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पेडर रोडवरील मतदान केंद्रात जाऊन मतदान केले आहे. मतदानानंतर पवारांनी काल केलेल्या पंतप्रधानपदाच्या विधानावर भाष्य केले. त्यावेळी पवारांनी राहुल गांधींऐवजी पंतप्रधानपदासाठी ममता, मायावती आणि चंद्राबाबूंची नावे पुढे केली होती. त्याच विधानावर पवारांनी आता यू-टर्न घेतला आहे. अशी बातमी केवळ टीआरपीसाठी छापून आणल्याचा आरोपही पवारांनी प्रसारमाध्यमांवर केला आहे.
आजचा दिवस देशासाठी महत्त्वाचा असून, देशात स्थिर सरकार येणं गरजेचं आहे. मुंबईतल्या मतदानाच्या टक्केवारीबाबत काळजी वाटत असली तरी मुंबईकर उत्साहानं मतदानाचा हक्क बजावतील. माझ्यासाठी मावळ काय, बारातमी काय आणि मुंबई काय सगळ्याच निवडणुका महत्त्वाच्या आहेत. मतदान करण्याची संधी मला मिळाल्याने मी आनंदी आहे, सुट्ट्या आहेत लोक बाहेर गेले आहेत असे म्हणतात. पण मला असे वाटते मुंबईकर मतदानात मागे राहणार नाहीत. यंदा लोक निर्णायक निर्णय घेतली, असेही पवार म्हणाले आहेत.