मोफत कांदा वाटप शेतकर्याकडून सरकारचा निषेध
बारामती : जैनकवाडी येथील शेतकरी दिनेश काळे यांनी बाजारभावाअभावी दोन टन कांदे मोफत वाटले. यावेळी दानपेटीत जमा झालेल्या रकमेतून सोमवारी (दि.10) त्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना प्रत्येकी 1419 रुपयांची मनिऑर्डर करून सरकारचा निषेध केला आहे. शेतकरी काळे यांनी दोन मुलांसह बारामती नगरपरिषदेसमोर मोफत कांदा वाटप केले. कांद्याला समाधानकारक दर मिळत नसल्याच्या निषेधार्थ त्यांनी हे पाऊल उचलले होते. या वेळी जवळच दानपेटी ठेवून स्वेच्छेने दान करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. त्यातून त्यांना 2 हजार 980 रुपयांची रक्कम जमा झाली होती. खा. राजू शेट्टी यांनीही त्यांची भेट घेत सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतमाल फुकट वाटण्याची वेळ आल्याची टीका केली होती.
काळे यांनी बारामती पोस्ट कार्यालयातून ही मनिऑर्डर पाठवली. त्यासाठी त्यांना प्रत्येकी 71 रुपये खर्च आला. शासन शेतकर्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे कांदा विक्री करतानाच अशा शेतकर्यांच्या अभिनंदनाचा फलक लावला होता. आता दानपेटीतील रक्कम पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पाठवली असल्याचे काळे यांनी यावेळी सांगितले.