पंतप्रधान मोदींनी ज्या स्टेशनवर चहा विकला, त्या स्टेशनचा कायापालट होणार

0

नवी दिल्ली ।  पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीत वडनगर रेल्वे स्टेशनवर चहा विकल्याचे सांगायचे. त्यामुळे हे रेल्वेस्थानक चर्चेत आले होेते. आता या रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी केंद्र सरकारने 8 कोटींचा निधी दिला आहे. केंद्रीय पर्यटनमंत्री मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी ही माहिती दिली आहे. सचाना गावामध्ये इनलँड कंटेनर डिपो (आईसीडी)च्या उद्घाटनाच्यावेळी ते बोलत होते. वडनगर हे मेहसाना जिल्ह्यात आहे. या स्टेशनच्या जवळच मोधेरा आणि पाटन ही पर्यटनस्थळे आहेत. पर्यटनाला चालना मिळावी यासाठी 100 कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत वडनगर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी 8 कोटींचा निधी राज्य पर्यटन विभागाला देण्यात आला आहे.

वडनगर येथे मिटरगेज रेल्वे लाईन आहे. त्यामुळे वडनगर ते मेहसाना हा ब्रॉडगेज मार्ग करण्याचे काम सुरू आहे. आता निधी दिल्यानं हे काम जलदगतीनं होणार असल्याचं सिन्हा यांनी सांगितलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आपण वडिलांसोबत वडनगर रेल्वे स्थानकावर चहा विकल्याचे सांगत होते. त्यामुळे वडनगर रेल्वे स्थानक चर्चेत आले होते.