पंतप्रधान मोदींबाबत टीकटॉकवर आक्षेपार्ह व्हिडीओ ; समता नगरात तणाव

0

रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ः चार जण ताब्यात

जळगाव : शहरातील समता नगर परिसरात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओवरुन दोन गटात तणाव निर्माण झाला होता. वेळीच रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येवून पोलिसांनी जुबेर अकील खाटीक (18), जाफर शकील खाटीक (22), अकबर सलीम सैय्यद (18) व अरबाज शकील सैय्यद (19) सर्व रा.वंजारी टेकडी, समता नगर,जळगाव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

व्हिडीओ सर्वत्र व्हायरल
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समता नगरातील चौघांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी टीकटॉक या सोशल मीडियाच्या अ‍ॅपवर आक्षेपार्ह व्हिडीओ बनविला. सोमवारी हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. शहरातील एका गटाने हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दहा ते बारा जणांचा गट समता नगरात या चारही तरुणांकडे चालून गेला.

चौघांवर गुन्हा ; मोबाईल जप्त
दोन गटातील वाद असल्याने काही रहिवाशांनी रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. सहायक फौजदार गोपाळ चौधरी, सतीश डोलारे, महेंद्र पाटील, वासुदेव मोरे आदींचे पथके दोन वाहनातून घटनास्थळी पोहचले. पोलिसांना पाहताच एक गट फरार झाला तर पळापळ झाली. अधिकच्या चौकशीत जुबेर, जाफर, अकबर व अरबाज या चौघांनी आक्षेपार्ह व्हिडीओ बनविल्याचे उघड झाले. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी अधिक चौकशी करुन त्यांचे मोबाईल जप्त केले. दरम्यान, चौघांवर धार्मिक भावना भडकावून दोन गटात तेढ निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.