लातूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील प्रचारसभेत बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. नरेंद्र मोदी हे पाकिस्तान सोबत दुश्मनीची, धडा शिकवण्याची भाषा करतात. लाल किल्ल्यावरून पाकिस्तानला तोडण्याची भाषा करतात. त्यामुळे देशाचा पंतप्रधान हा दंगलखोर असल्याचे खळबळजनक वक्तव्य आंबेडकर यांनी केले आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी पंतप्रधानांना नोटबंदीचा निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे. जर नोटबंदीचा निर्णय घ्यायचा असेल तर सरकार बोर्ड ऑफ गव्हर्नरला नोटबंदी करू शकते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली नोटबंदी ही नियमांना डावलून केलेली असून याप्रकरणी सुप्रीम कोर्टानेही पंतप्रधानांवर ताशेरे ओढल्याचा दावा यावेळी आंबेडकर यांनी केला. मुळात प्रत्येक नोटांवर त्या नोटांचे व्हॅल्यू देण्याचे वचन छापले जाते. त्यामुळे त्या बदलून देणे शक्य असल्याचेही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले.
गुन्हा दखल
निवडणूक आयोगा बद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यवतमाळ येथे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभेत आंबेडकर बोलत असताना पुलवामा घटनेबद्दल बोलण्यास मनाई करणाऱ्या निवडणूक आयोगाला आमची सत्ता आल्यास दोन दिवस कारागृहात टाकू, असे आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानानंतर यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदविला असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.