पंधरवाड्यात शेतकर्‍यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्या

0

जळगाव । बँकांकडे कर्ज मागणीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांवर 15 दिवसांच्या आत कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज सर्व बँकांच्या अधिकार्‍यांना दिले. जिल्हास्तरीय बॅकर्स सल्लागार समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक पी.पी. गिलाणकर, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा ग्रामीण विकास संस्थेचे प्रकल्प संचालक श्री. शिरसाट, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे श्री. ईखारे यांचेसह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कर्ज मागणी अर्जांवर बँकांनी 15 दिवसांच्या आत कार्यवाही
जिल्ह्यात खरीपाचा हंगाम सुरु झालेला असल्याने सर्व बँकांनी शेतकर्‍यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे. पीक कर्ज देतांना शेतकरी कर्जमाफी योजनेचे लाभ घेतलेले शेतकरी तसेच एकरक्कमी समझोता योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकर्‍यांनाही पीक कर्जाचे वाटप करावे. पीक कर्जाची मागणी केलेला जिल्ह्यातील एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता बँकांनी घ्यावी. त्याचबरोबर पीक कर्जासंबंधात शेतकर्‍यांच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा सर्व संबंधितांवर जबाबदारी निश्‍चित करण्याचा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला. तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास पात्र असणार्‍या लाभार्थ्यांनी कर्जाची मागणी केल्यास त्यांच्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करावी. लाभार्थी कर्जास पात्र असल्यास त्याचे कर्ज प्रकरण मंजूर करावे व अपात्र असल्यास तसे त्याला 15 दिवसाच्या आत कळविण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी बँकेच्या अधिकार्‍यांना दिलेत.

योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज वाटपासाठी नाबार्डकडे मागणी केलेला निधी नाबार्डने तातडीने उपलब्ध करुन द्यावा. जेणेकरुन शेतकर्‍यांना पीक कर्जाचे वाटप वेळेत करता येईल. असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, बँकांनी कर्जदार शेतकर्‍यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी करुन घेण्याबरोबरच बिगर कर्जदार शेतकर्‍यांनाही या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करावे. मुद्रा बँक योजनेबाबत अनेक बँका लाभार्थ्यांना कर्जाचे वाटप वेळेत करीत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. यावर बँकांनी मुद्रा बँक योजनेत पात्र लाभार्थ्यांना मुद्रा बँक योजनेचा लाभ देण्याचे आवाहन केले. तसेच विविध महामंडळामार्फत बँकांकडे पाठविण्यात आलेल्या कर्ज प्रकरणांचा निपटारा बँकानी तातडीने करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात.