पंधराच दिवसात उखडला रस्ता

0

बोदवड : तालुक्यातील शेलवड-वाकी रस्त्याचे 15 दिवसांपुर्वीच डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असून काही दिवसातच या रस्त्यावर खड्डे पडले असल्याचे दृष्टीस पडत आहे. या रस्त्यावर टाकण्यात आलेली खडी उघडी पडली असून यात डांबराचा अत्यंत कमी प्रमाणात वापर केले असल्याचे दिसून येत आहे. तसेच रस्ता बनविण्याअगोदर त्यावरील धुळ साफ न करता मातीमिश्रीत खडे पसरवून त्यावर कोट न मारता डांबर अंथरण्यात आले. तसेच व्यवस्थितपणे दबाई न केल्यामुळे रस्ता उचडत असल्याचे दिसून येत आहे. वाकी फाट्यापासून ते सुरेश पाटील, जगदेव बोदडे, भरत बोदडे यांच्या शेतापर्यंत खडी उकडून मोठमोठे खड्डे पडले आहे. संबंधित ठेकेदाराने हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

खडी, डांबराचे प्रमाण अयोग्य
हा रस्ता पूर्वी खराब असल्यामुळे शेलवड गावाजवळून मुक्ताईनगर, जामनेर जाणार्‍या बसेस गावातून जात नसत. परंतु 15 दिवसात या कामाचे 12 वाजले असल्याचे दिसते. या कामाची पाहणी केली असता वापरण्यात आलेली खडी प्रमाणात नाही. खडी पसरवण्याअगोदर रस्त्यावरील धूळ साफ न करता टॅग कोट केल्याचे दिसून येेते. डांबराचे प्रमाण अत्यंत कमी वापरल्यामुळे याला खडी चिकटत नसल्याने ठिकठिकाणी खडी उखडली आहे. त्यामुळे वाकी फाट्यापासून ते शेलवड गावापर्यंत अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी याबाबत लक्ष देवून चौकशी करण्याची मागणी शिवाजी पाटील, चरण बोदडे व शेलवड येथील ग्रामस्थांनी केली आहे.

लाखो रुपये खड्ड्यात
कोणत्याही रस्त्याचे काम करताना याठिकाणी संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकार्‍यांनी भेट देऊन कामाची गुणवत्ता तपासणी करण्याची आवश्यकता असते. मात्र या रस्त्याचे काम सुरु असताना संबंधित अधिकार्‍यांनी कुठलीही पाहणी केली नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मक्तेदाराने या कामात उत्कृष्ठ साहित्य न वापरता केवळ चालढकल केल्यामुळे केवळ पंधराच दिवसात या रस्त्यावरील खडी उखडल्यामुळे या रस्त्याचे काम झाले किंवा नाही असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या रस्त्याच्या कामासाठी शासनाचा लाखो रुपयांचा निधी वापरण्यात आला आहे. मात्र अशा निकृष्ट कामामुळे हा सर्व पैसा खड्ड्यात गेल्याचे दिसून येते. त्यामुळे याबाबत वरिष्ठांनी या कामाची तपासणी करुन संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.