जळगाव। वडील व भावाकडे वैधता असतांनाही मुलाला वैधता प्रमाणपत्र नाकारल्यामुळे नंदुरबार अनुसुचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीस हायकोर्टाने फटकारले न्या. मंगेश जे. पाटील व न्या. एस. सी. धर्माधिकारी यांनी 2 याचिकांवर निकाल देतांना ‘पंधरा दिवसात टोकरे कोळी जमातीचे वैधता प्रमाणपत्र द्या अन्यथा पन्नास हजाराच्या दंडास तयार राहा’ असा आदेश देत समाजबांधवांना दिलासा दिला आहे.
दोघांची न्यायालयात धाव
तुषार बाबीस्कर व रोहन सोनवणे या विद्याथ्यांची जात प्रमाणपत्र नंदुरबार समितीने अवैध ठरवलेली होती वडीलांकडे व भावाकडे वैधता असतांना तुषार व रोहन यांना वैधता मिळणे क्रमप्राप्त होते, पण समितीने नकार दिल्याने त्यांनी खंडपीठाकडे दाद मागीतली. नाशिक समितीच्या वैधतेवर नंदुरबार समितीने शंका घेतल्याने हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली. नंदुरबार समितीने कायद्याच्या मुळ हेतूचा सत्यानाश केलेला असून टोकरे कोळी व महादेव कोळी समाजाबद्द्ल असाच दृष्टीकोन ठेवला तर समित्या बरखास्त करण्याचा विचार करावा लागेल, असाही कोर्टाने इशारा दिला आहे.
निकालाचे स्वागत
या निकालाबाबत सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सपकाळे यांनी समाधान व्यक्त केले नंदुरबार समितीने या निकालानंतर तरी कारभारात सुधारणा करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कोळी समाजातील सेवानिवृत्त जनगणना अधिकारी श्यामकांत शिरसाठे यांनी हा निकाल ऐतिहासीक असून सदर निकालाच्या अनुषंगाने आजवर चालत असलेल्या टोकरे कोळी बांधवांच्या लढ्याला बळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.