पंधरा दिवसापासून बिबट्याचा धुमाकूळ

0

साक्री । तालुक्यातील विजापूरपाडा व कावठे शिवारात गेल्या पंधरा दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गुरुवारच्या रात्रभर दहशत निर्माण करणा-या बिबट्याने कावठे शिवारात घोडी फस्त केली. बिबट्याच्या दररोजच्या वावरामुळे शेतात वास्तव्यास असणा-या शेतक-यांनी भिती निर्माण झाली असून मजूरही येत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.गेल्या मंगळवारी म्हसदी शिवारात बिबट्याने कालवड फस्त केली होती. यानंतर कावठे येथील बाघड्या डोंगरालगतच्या शिवारात हल्ला करत सोमा यसा गोयकर यांची घोडी बिबट्याने फस्त केली. काही दिवसांपूर्वी त्याच शिवारात भिका शाळू गो-हे यांच्या चार मेंढ्या बिबट्याने फस्त केल्या. परिसरात सुमारे दहा ते बारा घरे शेतात बांधलेली आहेत. बिबट्यामुळे शेतक-यांनी रात्र जागून काढली. वनपाल पी.एस.जगताप यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

मजुरांचा शेतात कामाला येण्यासाठी नकार
दरम्यान,विजापूरपाडा शिवारात सध्या टोमॅटो, गवार, हिरवी मिरची यासारखा भाजीपाला काढला जात आहे. या भागात बिबट्या असल्याच्या भितीने मजूर कामावर येत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. भाजीपाला पीकात बिबट्या दबा धरुन बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन विभागाच्या कार्यलयात बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन पंचायत समितीचे सदस्य उत्पल नांद्रे यांनी दिले आहे . यावेळी सोमा गोयकर,दामू गोयकर व भिका साळू हेदेखील उपस्थित होते.