पंधरा दिवसापासून सुरु होते लीडरशीप कॅम्प; देशभरातून होती विद्यार्थ्यांची उपस्थिती
जळगाव । समाजात फुट पाडून हिंसेला बळी पाडण्याचे काम दुर्जन करतात. फुट पाडणारे मोजकेच असतात. परंतु सज्जनांची संख्या मोठी असूनही ते सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. या सज्जनांना गांधीजींच्या अहिंसेच्या माध्यमातून क्षत्रिय करण्याची गरज आहे. हे कार्य करण्यासाठी नॅशनल गांधीयन लीडरशीप कॅम्पमधील प्रत्येकाने पुढे यावे, जेणे करून खर्या अर्थाने स्वातंत्र्याची अनुभूती होईल, असा संदेश ज्येष्ठ गांधीयन एस. एन. सुब्बाराव यांनी समारोपा प्रसंगी दिला. गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि गांधीयन सोसायटीच्या माध्यमातून नॅशनल गांधीयन लीडरशीप कॅम्प गांधी तीर्थ येथे गेल्या पंधरादिवसांपासून सुरू होता. यात महाराष्ट्र, बिहार, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, ओडिसा, गुजराथी, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू अशा अठरा राज्यांमधुन ४५ विद्यार्थी सहभागी झाले होते. गांधी तीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात कॅम्पचा शुक्रवारी १५ रोजी समारोप झाला.
प्रत्येकाने अहिंसेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन
कॅम्पमध्ये यांनी केले मार्गदर्शन
नॅशनल गांधीयन लीडरशीप कॅम्पमध्ये महात्मा गांधी यांच्याविषयी उपस्थित प्रश्नांबाबत तुषार गांधी यांनी मार्गदर्शन केले. डॉ. जॉन चैल्लादूरै यांनी दक्षिण आफ्रिका सत्याग्रह या विषयावर, चंपारण्य सत्याग्रह आणि गांधीजींचे नेतृत्व यावर अरविंद मोहन, अहमदाबाद खेडा सत्याग्रह डॉ. सुदर्शन आयंगार, भारत छोडो आंदोलन प्रा.एम.पी. मथाई, गांधी- विनोबा व ग्राम स्वराज्यची कल्पना डॉ.उल्लास जाजू, सामुदायिक एकता डॉ. विश्वास पाटील, गांधीजींचे आर्थिक नेतृत्व निमीषा शुक्ल, पुणा करार शांताराम पंदेरे, लोकनेता गांधीजी कुमार प्रशांत, राष्ट्रीय एकतामध्ये युवकांची भुमिका ज्येष्ठ गांधीयन एस.एन. सुब्बाराव यांनी मार्गदर्शन केले.
गांधीयन सोसायटीचे सहकार्य
याप्रसंगी दलीचंद जैन, अतुल जैन, डॉ. सुदर्शन अय्यंगार, गांधीयन सोसायटीचे बुट्टाला, कर्नाटकच्या अपर्णा राव, अश्विन झाला, डॉ. जॉन चैल्लादूरै आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणाच्या सुरुवातीलाच एस.एन.सुब्बाराव यांनी गीत सादर करून युवकांमध्ये चेतना जागविली. जीवनात शिक्षण घेवून डिग्री मिळविणे एवढेच ध्येय युवकांचे नसावे. तर समाजातील हिंसा, भ्रष्टाचार मिटविण्यासाठी काय करता येईल, याचा विचार प्रत्येकाने करावा असे आवाहन त्यांनी केले. यशस्वीतेसाठी उदय महाजन, विनोद रापतवार, सुधीर पाटील, राजेंद्र जाधव, प्रशांत सूर्यवंशी, चंद्रकांत चौधरी, मयुर गिरासे यांच्यासह गांधी रिसर्च फाऊंडेशन व गांधीयन सोसायटीचे सहकार्यांनी सहकार्य केले.