नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) केलेल्या कारवाईत 15 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. हे ऑपरेशन 13 ते 15 मे दरम्यान राबवण्यात आले. सीआरपीएफने याबाबत घोषणा केली. या ऑपरेशनमध्ये सीआरपीएफचा एक जवान हुतात्मा झाल्याचेही वृत्त आहे. तसेच दोन जवान जखमी झाले आहेत. नक्षलवाद्यांमध्ये वायरलेसवर झालेल्या संभाषणावरून पोलिसांना त्यांचा ठावाठिकाणा समजला होता. काही दिवसांपुर्वी सुकमा हल्ल्यात नक्षलवाद्यांनी 25 सीआरपीएफ जवानांना लक्ष्य केले होते, त्याचा बदला अखेर घेण्यात आला आहे.
अशी झाली कारवाई
नक्षलवाद्यांचे वायरलेसवरील संभाषण ट्रेस झाल्यानंतर बिजापूर जिल्ह्यातील रायगुडम परिसरात कोब्रा पोलिस आणि जिल्हा पोलिसांचे संयुक्त पथक गस्तीसाठी जंगलात गेले होते. यावेळी नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनीही नक्षल्यांच्या गोळीबारास चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत 15 ते 20 नक्षलवाद्यांना ठार केल्याचा दावा सीआरपीएफचे पोलिस महानिरीक्षक देवेंद्र चौहान यांनी केला आहे. गोळीबार करणार्या नक्षलवाद्यांची संख्या सुमारे 100 ते 150 होती, असेही देवेंद्र चौहान यांनी सांगितले. सीआरपीएफने केलेल्या या कारवाईचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तो या कारवाईचाच असल्याचा दुजोरा सीआरपीएफने दिला आहे. मात्र नक्षलवाद्यांचे मृतदेह अद्याप हाती आलेले नाहीत.
सुकमातील हल्ला सर्वात मोठा
24 एप्रिल रोजी छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 25 जवान हुतात्मा झाले होते. हे जवान तेथे रस्ते बनवण्यासाठी प्रशासनाला मदत करत होते.सुमारे 250 नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हा हल्ला केला होता. या नक्षलवाद्यांकडे अत्याधुनिक हत्यारे होती.