पुणे : संगीत नाटकांमधील अभिनेते पं. नारायण बोडस यांचे सोमवारी पुण्यात निधन झाले. ते ग्वाल्हेर घराण्याचे गायक होते. त्यांनी साहित्य संघाच्या अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. थेट विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या गायकीशी नाते सांगणार्या बोडस घराण्यात नारायणरावांचा जन्म झाला. त्यांचे संगीताचे शिक्षण वडील लक्ष्मणराव तसेच प्रल्हादपंत गानू यांच्याकडे झाले. नोकरी आणि शास्त्रीय गायनाचा रियाज अशी कसरत करीत त्यांनी संगीत साधना केली. गायक नट म्हणून त्यांच्या कारकीदीर्ची सुरुवात ’सौभाग्यरमा’ या डॉ. बी. एन. पुरंदरेलिखित नाटकापासून झाली होती.
संस्कृत रंगभूमीवरही वावरले!
दाजी भाटवडेकर यांना सौभाग्यरमा या नाटकातील नारायणरावांचे व्यक्तिमत्त्व आवडले. संस्कृत भाषेत नाटके करणार्या दाजींना आपल्या संस्कृत नाटकासाठी असाच बोलक्या चेहर्याचा, भारदस्त आवाजाचा व चांगला गायक असणारा नट हवा होता. त्यांनी लगेच ’सं. शारदा’ या नाटकासाठी त्यांची निवड केली. त्यानंतर दाजी भाटवडेकरांच्या अनेक नाटकात त्यांनी भूमिका केल्या. त्यानंतर त्यांनी सं. सौभद्र, पती गेले ग काठेवाडी, बुद्ध तिथे हरला, सं. मृच्छकटिका, सं. महाश्वेता, सं. मानापमान, सं. स्वयंवर, सं. सौभद, सं. संशयकल्लोळ, सं. धडिला राम तिने का वनी?, सुंदर मी होणार, मंदारमाला, सुवर्णतुला, बावनखणी, संत गोरा कुंभार, लहानपण देगा देवा, देव दीनाघरी धावला, तो एक राजहंस, सं. कृष्णार्जुनयुद्ध, अशा अनेक संगीत व बिगर संगीत नाटकात अविस्मरणीय व गाजलेल्या भूमिका केल्या. त्यांनी काही चित्रपट व टीव्ही मालिकांतूनही काम केले, पण त्यांना संगीत रंगभूमीच अधिक भावली.
1993 मध्ये रंगभूमीचा घेतला निरोप
1993 मध्ये गोव्यात संगीत सौभद्रमध्ये अखेरची भूमिका करून रंगभूमीचा निरोप घेतला. त्यानंतर त्यांनी संगीत अध्यापनाचे काम सुरू केले. 12 वर्षे त्यांनी मुंबई विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संगीत शिकवले. तेथून निवृत्त झाल्यावर 2006 सालापासून ते वाशी येथील गांधर्व महाविद्यालयात संगीत शिकणार्या विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करीत होते. त्यांच्या या प्रदीर्घ संगीतसेवेचा शासनाने बालगंधर्व पुरस्कार देऊन गौरव केला होता.