पुणे । विदुषी देवकी पंडित यांनी सादर केलेला राग गावतीचा अविष्कार, त्यानंतर पं. योगेश समसी यांच्या जादूयी तबलावादनाने श्रोत्यांना भूरळ घातली होती. प्रेक्षकही त्यात तल्लीन झाले होते. अशा मनमोहक स्वर सोहळ्याने सर्वच जण भारावून गेले होते. तालानुभूती फाउंडेशन आणि ओएनपी ट्युलीप हॉस्पिटल्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्वरपर्व या सांगीतिक मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. पुण्यातील प्रसिध्द स्त्रीरोगतज्ज्ञ आणि श्री क्लिनिक नर्सिंग होमचे संस्थापक स्व. डॉ. एच. एन. फडणीस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ओएनपी ट्युलीपच्या संस्थापिका डॉ. अमिता फडणीस, तालानुभूती फाउंडेशनचे संस्थापक रोहित मुजुमदार, सुमती फडणीस आदी उपस्थित होते.
सूर मल्हारने वाढवली रंगत
देवकी पंडित यांनी गावती या रागाने मैफलीची सुरुवात केली. त्यांनी यावेळी ख्याल आस लागी तुम्हरे चरणन की ही विलंबित एकतालातील रचना सादर केली. हमरी पार करो साईं ही दृतलय तीन तालातील छोटी बंदिश आणि राग सुर मल्हारमधील त्यांनी सादर केलेल्या रचनांनी कार्यक्रमाची रंगत वाढली. याबरोबरच बादलवा बरसन को आये, तसेच चैथीमध्ये सावनकी रितू आयी रे सजनवा याही रचना त्यांनी सादर केल्या. त्यांना रोहित मुजुमदार (तबला), मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), गौरी बोधनकर (तानपुरा) यांनी तितकीच दमदार साथसंगत केली.
ताबला वादनाने जिंकली उपस्थितांची मने
पं. योगेश समसी यांनी तीन तालामध्ये पेशकार, कायदा, रेला सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रसिद्ध तबलावादक पद्मश्री उस्ताद अल्लारखा खाँ यांचे शिष्य असलेल्या पं. समसी यांना मिलिंद कुलकर्णी (संवादिनी) यांनी साथसंगत केली. पं. समसी यांनी आपल्या खास शैलीत मध्यलय तीन तालामधील पंजाब घराण्याच्या रचना सादर केल्या. भरगच्च सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. त्यांच्या तबलावादनाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. डॉ. प्रीती जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.